बर्लीनला शिकत असलेल्या नागपूरकर ऋतुजा गोळेचा अनुभव
नागपूर : कु टुंबातील सर्वात शांत सदस्य अशी ‘ती’ची ओळख. अचानक शिक्षणासाठी तिने जर्मनीला जाण्याचा निर्णय घेतला. वर्ष पूर्ण होत नाही तोच जगभरात करोनाची साथ पसरली, त्यात जर्मनीही होते. इटलीत करोनाचा प्रकोप असताना त्याच कालावधीत ती दोन दिवस इटलीला जाऊन आली. हा प्रवास अतिशय भीतिदायक ठरला, बर्लीनला शिकत असलेल्या नागपूरकर ऋतुजा गोळेचा हा अनुभव!
आपल्या शहरापासून हजारो किलोमीटर दूर राहण्याची ही माझी पहिलीच वेळ. एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी नागपूर ते बर्लिन हा प्रवास पहिल्यांदाच एकटीने केला. तेव्हा थोडी भीती वाटली होती, पण नंतर बर्लिन शहराने आपलेसे करून घेतले. विदेशात शिक्षण घेत असताना जगावर आलेले करोनाचे संकट आणि मायदेश(भारत) या विषाणूच्या विळख्यात सापडल्याचे कळल्यानंतर नागपूर ते बर्लिन या पहिल्या प्रवासापेक्षाही अधिक भीती वाटली. फेब्रुवारीत मी इटलीला जाऊन आले होते. अवघ्या एक-दोन दिवसासाठी गेले असले तरीही ताप, सर्दी, खोकला ही करोनात जाणवणारी सारी लक्षणे मलाही जाणवू लागली. मात्र, चाचणी अहवाल नकारात्मक आला आणि सुटकेचा श्वास सोडला. बर्लिन शहरातही करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातल्या त्यात या शहरात ७० टक्के नागरिक हे वयाची साठी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिक. त्यामुळे घराबाहेर पडण्यास मनाई असतानाही कुठल्यातरी कारणाने ही मंडळी घराबाहेर पडतच होती. त्यावेळी आपल्या देशाची आठवण नक्कीच झाली. कारण कितीही सांगितले तरी घराबाहेर पडणारच ही मनोवृत्ती आपल्यातही आहेच.
गेल्या काही दिवसांपासून मात्र येथील प्रशासनाने निर्बंध अगदी कडक केले आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठीच घराबाहेर पडायचे आणि एकदाच काय ते घेऊन यायचे. दुकानात जातानाही मास्कशिवाय कोट घालायचा. दुकानाच्या बाहेर हा कोट काढून ठेवायचा आणि मग शरीरावर एक विशिष्ट स्प्रे मारल्यानंतरच आत सोडायचे, असा कडक नियम बर्लीनच्या प्रशासनाने घालून दिला आहे.
येथेही कार्यालये, शैक्षणिक संस्था बंद आहेत. परिस्थितीनुरूप आम्हीही घराबाहेर पडण्याचे टाळले आणि घरात बसूनच दिलेल्या प्रकल्पाचे काम पूर्ण करणे सुरू के ले. आता येथील स्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे अभ्यास घरून होत असला तरीही नोकरीसाठी काही तास आम्ही घराबाहेर पडतोय. भारतातही परिस्थिती नक्कीच नियंत्रणात येईल अशी अपेक्षा आहे. असे अनुभवकथन ऋतुजाने केले.