*राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय * पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी के ले होते भूमिपूजन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : पूर्व नागपुरातील कळमना भागात  मंगळवारी कोसळलेल्या उड्डाण पुलाच्या बांधकामाची तज्ज्ञांच्या समितीमार्फ त चौकशी करण्याचे आदेश भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (एनएचएआय) दिले आहे. या पुलाचे भूमिपूजन २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते हे येथे उल्लेखनीय.

कळमना ते एच.बी. टाऊन मार्गावरील निर्माणाधीन उड्डाण पुलाचा काही भाग मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास कोसळला होता. रात्री रस्त्यावर वर्दळ नसल्याने या दुर्घटनेत सुदैवाने प्राणहानी झाली नाही. एनएचआयएने उड्डाण पुलाचे काम  गॅनॉन डन्कर्ली अँड कंपनी लि. आणि  एसएमएस इन्फ्रास्ट्रकचर लि.(जेव्ही) यांना दिले होते. १९ ऑक्टोबरला ९.२० च्या सुमारास या पुलाचा कळमना ते एच.बी. टाऊन बाजूचा काही भाग खचला. तर दुसऱ्या बाजूचा भाग थोडा वरच्या भागाने सरकला आहे. तथापी, या घटनेचे अद्याप तरी नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. सध्या काम बंद होते. ज्या ठिकाणी पुलाचा भाग कोसळला त्याचे बांधकाम २० जानेवारी २०१८ ला झाले होते.  यावर पुलाचा भाग १३ एप्रिल २०१८ ला जोडण्यात आला.

कोसळलेल्या पुलाचा भाग एम५५ काँक्रिट ग्रेडचे होते आणि जानेवारी २०१८ पासून त्या काहीच उणिवा दिसून आल्या नाही. ते उभारताना अथॉरिटी इंजिनिअर (एम/एस. लासा, मुंबई)ने सर्व चाचण्या केल्या होत्या. जो भाग खचला त्याची निर्मिती मेटल इंजिनिअरिंग अँड ट्रिटमेंट को. प्रा.लि. (एमईटीसीओ) आणि उषा मार्टिनचे एच.टी. स्ट्रँड वापरण्यात आले, असा दावा एनएचआयने के ला आहे.

विलंबामुळे खर्च ३५० कोटींनी वाढला

या पुलाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१४ ला झाले. हे काम तीन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु  विलंबाने कामाला सुरुवात झाली. त्यामुळे प्रकल्पाची किंमत ३०० कोटीवरून सुमारे ६५० कोटीवर गेली आहे. अजूनही हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी सज्ज झालेला नाही.

तक्रारीकडे दुर्लक्ष

पुलांचे  बांधकाम निकृष्ट असल्याकडे स्थानिकांनी अनेकदा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. विलंब होत असल्यामुळे स्थानिक नगरसेवकांनी आंदोलन देखील केले होते. त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे जानेवारी २०२२ पर्यंत हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, उड्डाण पुलाचा काही भाग कोळसला. त्यामुळे पुन्हा या पुलावर वाहतूक सुरू करण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आंदोलनावर खोपडेंची टीका

उड्डाण पुलाचा काही भाग कोसळ्याची घटना दुर्दैवी आहे. याची चौकशी होऊन दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई केली जाणार आहे. मात्र यात या घटनेवरुन विरोधी पक्षांकडून केले जात असलेले आंदोलन म्हणजे विकासकामात नापास झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना नेत्यांच्या उलटय़ा बोंबा आहे, अशी टीका भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Experts committee inquiry of construction of collapsed flyover zws
First published on: 21-10-2021 at 03:35 IST