नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणावरून मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत १५ दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा आदेश राज्य सरकारचे अपयश आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कार्यकाळ संपलेल्या महापालिकेत सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रशासक ठेवता येत नाही. संविधानात तशी तरतूद आहे. यामुळे अशा सर्व महापालिकांच्या निवडणुका तात्काळ घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालायने दिला आहे. हे १०० टक्के सरकारचे अपयश आहे. दोन वर्षे सरकारने वेळकाढू धोरण अवलंबले, ‘ट्रिपल टेस्ट’ पूर्ण केली नाही. त्यामुळे अशाप्रकारचा निर्णय आला. या निर्णयामुळे ओबीसींचे नुकसान होणार असून त्यास सरकार जबाबदार असेल.

राज्य शासनाचा करंटेपणा : राणा दाम्पत्याला जामीन मिळणे स्वाभाविक आहे. राज्य सरकारने हनुमान चालीसा पठणावरून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा करंटेपणा केला होता. तो न्यायालयात टिकू शकला नाही. अनधिकृत भोंगे काढण्याबाबत राज्य सरकारने भूमिका घेणे अपेक्षित होते मात्र ते घेत नाही, त्यामुळे अन्य राजकीय पक्षाला ती घ्यावी लागत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

‘आरक्षणाच्या जागांवर भाजपकडून ओबीसी उमेदवार’

ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्पष्ट झाले असून महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मात्र या निवडणुकांमध्ये भाजप २७ टक्के आरक्षणाच्या जागांवर ओबीसी कार्यकर्त्यांना उमेदवारी देईल आणि या समाजाला न्याय देईल, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर

सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आदित्य ठाकरे ‘मर्सिडिझ बेबी’ आहेत. त्यांना संघर्ष करावा लागला नाही आणि त्यांनी संघर्ष पाहिलेलाही नाही. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षांची थट्टा ते निश्चितपणे उडवू शकतात. मात्र बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा लाखो कारसेवक तिथे होते. १८५७चा उल्लेख आदित्य ठाकरे यांनी केला, त्याबाबत सांगेन की, मी हिंदु आहे, माझा पुनर्जन्मावरही विश्वास आहे. मागच्या जन्मात मी तात्या टोपे आणि झाशीच्या राणींसोबत लढलेलो असेल आणि आदित्य ठाकरेंनी त्या वेळी इंग्रजांशी युती केली असेल. कारण त्यांनी आता ज्यांच्याशी युती केली आहे ते १८५७ला स्वातंत्र्ययुद्ध मानत नाहीत. ते या उठावाला शिपायांचे बंड म्हणतात, अशा शब्दात फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.

टोमणे आणि उत्तर दोन्ही थांबवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता या दोघांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे, उद्धव ठाकरे टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टींना उत्तर देणे सोडत नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी वर ठेवावी आणि त्यांच्या टोमण्यांना अमृतानेही उत्तर देऊ नये, असे म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि पत्नी अमृता या दोघांनाही सुनावले.