अन्न आणि औषध प्रशासनाचा कारखान्यावर छापा; सोनपापडीमध्ये सर्रास वापर
बाजारात गेल्यावर खरेदी केलेली वस्तू ही शंभर टक्के खरीच आहे असा विश्वास ठेवून चालणार नाही. विशेषत: खाद्य पदार्थाच्या बाबतीत तरी ग्राहकांना सावध असण्याची गरज आहे. दूध, खवा या पाठोपाठ आता पिस्ताही बनावट मिळू लागला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका कारखान्यावर छापा टाकल्याने ही बाब उघड झाली.
गोळीबार चौकातील पटवी मंदिर गल्लीत महादेवराव पवार यांच्या घरी बनावट पिस्ता तयार करण्याचा कारखाना असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. रंग दिलेल्या शेंगदाण्याच्या किसापासून तो तयार केला जात होता. अधिकाऱ्यांनी या कारखान्यावर छापा टाकला असता तेथे हे सर्व साहित्य आढळून आले. हा बनावट पिस्ता सोनपापडीत वापरला जातो. सोनपापडी तयार करणारे कारखाने या पिस्त्याचे ग्राहक आहेत. अधिकाऱ्यांनी एकूण १४६ किलो (किंमत १५ हजार) साठा जप्त केला असून त्याचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त न.र. वाकोडे यांच्या नेतृत्त्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अखिलेश राऊत, अभय देशपांडे, अखिलेश राऊत यांनी ही कारवाई केली.
सनासुदीच्या काळात मिठाई विक्रीत वाढ होते. त्याचा फायदा घेऊन शहरात मोठय़ा प्रमाणात बनावट खोवा आणला जातो. दही आणि दुधातही भेसळ केली जाते. खाद्य तेलाच्या बाबतीतही पाच प्रकार होतो. फळे लवकर पिकावी म्हणून रासायनिक पदार्थाचा वापर केला जातो. मात्र सुका मेव्याच्या बाबतीतही असा काही प्रकार होत असेल याबाबत सामान्य ग्राहक अनभिज्ञ होते. मात्र बनावट पिस्ता प्रकरणामुळे आता ग्राहकांना अधिक जागरुक राहावे लागणार आहे. नागपुरात सोनपापडीचे अनेक कारखाने आहेत. वेगवेगळ्या किंमतीत त्या विकल्या जातात. कमी किंमतीत मिळणाऱ्या सोनपापडीच्या दर्जाबाबत आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. विविध शाळेच्या पुढे किराणा दुकानात विकली जाणारी सोनपापडी निकृष्ट दर्जाची असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते.
असा तयार केला जातो बनावट पिस्ता
शेंगदाण्याला रंग दिला जातो. त्याची भुकटी करून रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. त्याला पुन्हा हिरवा रंग लावला जातो. तो पिस्ता म्हणून विकला जातो. खऱ्या पिस्त्याची बाजारात किंमत अधिक आहे. बनावट पिस्ता स्वस्त: किमतीत मिळतो. त्यामुळे मिठाई व अन्य पदार्थात त्याचाच मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो, अशी माहिती आहे.