अमरावती : निवडणुका आल्या की नव नवीन किस्से बघायला मिळतात. काही ठिकाणी कुटुंबातच राजकीय चढाओढ पहायला मिळते. असेच एक उदाहरण बघायला मिळत आहे ते दर्यापूरच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत. या शहरातील एका कुटुंबातील दोन भावांच्या पत्नी म्हणजेच जाऊ-जाऊ मध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. राजकारणाने नातेसंबंधांना निवडणुकीच्या आखाड्यात आणले आहे.

दर्यापूरमध्ये भाजपचे अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकळे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत, तर काँग्रेसने प्रकाश भारसाकळे यांचे धाकटे बंधू सुधाकर भारसाकळे यांच्या पत्नी मंदाकिनी भारसाकळे यांना उमेदवारी दिली आहे. या दोन कुटुंबातील राजकीय स्पर्धा नवीन नाही.

नऊ वर्षांपुर्वी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे नलिनी भारसाकळे आणि काँग्रेसतर्फे त्यांचे दीर सुधाकर भारसाकळे अशी लक्षवेधी लढत झाली होती. या निवडणुकीत नलिनी भारसाकळे यांनी सुधाकर भारसाकळे यांच्यावर ६६ मतांनी निसटता विजय मिळवला. त्यावेळी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी आपला गड शाबूत राखला होता. पण, आता या कुटुंबात दोन जावांमध्ये संघर्ष पहायला मिळत आहे.

प्रकाश भारसाकळे यांचे बंधू सुधाकर भारसाकळे हे काँग्रेसचे नेते आहेत. ते अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आहेत. प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी यांनी देखील राजकीय पदे भुषवली आहेत. या दोन भावांच्या कुटुंबातील राजकीय संघर्ष यावेळीही लक्षवेधी ठरला आहे.

प्रकाश भारसाकळे यांचा राजकीय प्रवास

भारसाकळे यांच्या राजकीय प्रवासाला शिवसेनेतून सुरुवात झाली. त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशाही गावपातळीवरील राजकारणापासून झाला. त्यांनी पंचायत समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. भारसाकळे हे १९९०, १९९५, १९९९, २००४ मध्ये सलग शिवसेनेच्या उमेदवारीवर दर्यापूर मतदारसंघातून विजयी झाले होते.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००५ मध्ये भारसाकळे यांनीही राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण काँग्रेसमध्ये ते जास्त काळ रमले नाहीत. २००९ च्या निवडणुकीत दर्यापूर अनुसुचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना अकोटमधून तिकीट नाकारले. त्यामुळे नाराज झालेल्या भारसाकळेंनी बंड पुकारले आणि अकोटमधून अपक्ष निवडणूक लढवली. नंतर भारसाकळेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट दिले आणि ते विजयीही झाले. २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत त्यांना भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. पण, दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी विजयश्री खेचून आणली.