बुलढाणा : शेतात काम करणाऱ्या ६१ वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. धाडस व प्रसंगावधान दाखवून आरडाओरड केल्याने शेतकऱ्याचे प्राण वाचले. आज, गुरुवारी अंत्री शिवारात ही घटना घडली असून जखमी शेतकरी शिवाजी कालेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कालेकर (रा. केळवद, ता. चिखली) यांची अंत्री शिवारात शेती आहे. ते गुरुवारी गव्हाला पाणी देत असताना त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढविला. कालेकर यांची हनुवटी, हात, छातीला जखमा झाल्या. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे व वन कर्मचारी यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.

हेही वाचा >>>मुनगंटीवार म्हणतात, ‘काँग्रेससाठी ही निवडणूक शेवटची…’

दुसरीकडे, वन्यप्राण्याच्या मुक्तसंचारामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. केळवद, अंत्री व आजूबाजुच्या परिसरात अस्वल, बिबट्याचा वावर वाढला आहे. हरीण, रोही हे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बिबट्याचा बंदोबस्त करून त्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर बिबट्याला जेरबंद करणार

आम्ही घटनास्थळाची पाहणी केली आहे. बिबट्याला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावण्यात येत असल्याचे आरएफओ नाईक यांनी सांगितले. परिसरात सलग दोन ते तिन दिवस बिबट्याचा अधीवास आढळल्यास त्याला जेरबंद करून जंगलात सोडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.