शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा तापल्याचं पहायला मिळालं. दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आलं. तसंच यावेळी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभेतही गोंधळ घातला. तसंच विरोधकांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांनी आपला शब्द पाळून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी करत भाजपा आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला.
शेतकरी कर्जमाफीवरून भाजपा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. तसंच सरकारकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसली जात आहेत, असा आरोपही यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांना जोवर मदतीची घोषणा होत नाही, तोवर सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्षाकडून घेण्यात आली. तसंच यावेळी भाजपाकडून वेलमध्ये उतरूनही घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, शेतकरी कर्जमाफीवर भाजपा नेते नितेश राणे यांनही आपली प्रतिक्रिया दिली. शिवसेनेनं म्हटलं होतं आपला खरा कणा हा शेतकरी आहे. त्यांना मदत जाहीर झालीच पाहिजे. जो पर्यंत त्यांना मदत जाहीर होणार नाही तोपर्यंत आम्ही सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी यावेळी घेतली.