scorecardresearch

मुलाच्या हातून वडिलांनी मोबाईल हिसकला अन् शाळेत पाठवले, मग मुलाने केले असे काही…

मोबाईल हिसकावून घेण्याचा या बाबांच्या कृतीचा राग आल्यामुळे अकरा वर्षीय मुलाने स्वत:चे अपहरणाचे नाट्य रचले.

मुलाच्या हातून वडिलांनी मोबाईल हिसकला अन् शाळेत पाठवले, मग मुलाने केले असे काही…
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

चंद्रपूर : मोबाईल खेळण्यात गुंग असलेल्या मुलाच्या हातून वडिलांनी मोबाईल हिसकावून घेत त्याला शाळेत पाठवले. वडिलांच्या या कृतीचा राग आल्यामुळे अकरा वर्षीय मुलाने स्वत:चे अपहरणाचे नाट्य रचले. शेवटी बिंग फुटले. मात्र, यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नाहक त्रास सहन करावा लागला. सध्या मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रीय असल्याच्या अफवा राज्यभरात पसरल्या आहेत. याचा फायदा चंद्रपुरातील एका अकरा वर्षीय मुलाने स्वत:चे अपहरण नाट्य घडवून आणण्यासाठी करवून घेतला.

शाळेची वेळ झाल्यानंतरही मुलगा शाळेत जात नसल्याचे पाहून वडील संतापले. वडिलांनी मुलाच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला, त्याला धाकदपट केली व शाळेत पाठवले. यामुळे मुलाचा राग अनावर झाला. शाळेत जायचे नाही आणि वडिलांचा रागही आलेला. अशा स्थितीत मुलाने शाळेच्या समोर येताच स्वत:च्या शर्टाची बटन तोडली. त्यानंतर तेथे उभ्या असलेल्या काही लोकांना कुणी अज्ञात व्यक्तींनी मला पेढा खाण्यास दिला, पेढा खाल्ला नाही म्हणून त्यांनी तोंडाला रूमाल लावून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, असा बनाव रचला.

हेही वाचा : कामानिमित्त बाहेर गेलेली आई अचानक घरात आली, अल्पवयीन मुलगी प्रियकरासोबत ‘नको त्या अवस्थेत’ दिसली अन्..

मुलाने दिलेल्या माहितीवरून शिक्षकांनी त्याच्या वडिलांना कळवले. वडिलांनी थेट शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. ही तक्रार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांच्याकडे वर्ग करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून निर्मल यांनी शाळा परिसरातील ‘सीसीटीव्ही फुटेज’ तपासले. त्यात काहीच दिसले नाही. त्यानंतर परिसरातील लोकांना विचारपूस केली. तिथेही काहीच मिळाले नाही. यानंतर पोलिसांनी मुलाला विश्वासात घेत विचारणा केली असता अपहरण नाट्याचे बिंग फुटले. मोबाईल हिसकावून घेत वडिलांनी शाळेत पाठवल्याने त्याने स्वत:च अपहरण नाट्य रचल्याचे सांगितले. हे ऐकून कुटुंबीयांना धक्काच बसला. अपहरण नाट्य खोटे असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. दरम्यान, असा प्रकार कुणीही करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या