विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण सदोष असल्याची चौकशी करण्याचे आदेश विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी आज दिले.
अधिवेशनाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण सदोष असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने गुरुवारच्या अंकात प्रकाशित केले होते. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींकडे थेट प्रक्षेपणाबद्दल १६ डिसेंबरला तक्रार केली होती. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांना आज या प्रकरणाच्या चौकशी आदेश दिले. विधिमंडळ सचिवालयाने तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हिवाळी अधिवेशन २३ डिसेंबपर्यंत आहे. त्यापूर्वी सदोष थेट प्रक्षेपणाचा अहवाल सभापतींकडे सादर होण्याची शक्यता आहे.