ब्रम्हपुरीतील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात नागपुरतील मुख्य सूत्रधार सिमरन उर्फ अक्षदा सुनील ठाकूर (२६) हिला पोलिसांनी अटक केली. तिला चंद्रपूरच्या न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> “उद्धव ठाकरेंचे भाषण मला ऐकायचे नाही, कारण….”; राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

ब्रम्हपुरीतील विदर्भ इस्टेट कॉलनीत भाड्याने घर घेऊन राहणारे लोणारे दाम्पत्य कोलकाता येथून अपहरण करून आणलेल्या अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार करून घेत होते. पोलिसांनी १७ सप्टेंबरला सापळा रचून तेथे छापा टाकला आणि लोणारे दाम्पत्याच्या तावडीतून त्या अल्पवयीन मुलीची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी मानव तस्करी अधिनियम पोक्सो, पिटा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करीत मंजित रामचंद्र लोणारे व चंदा मंजीत लोणारे या दाम्पत्याला अटक केली होती. लोणारे दाम्पत्याच्या पोलीस कोठडीदरम्यान नागपूरची सिमरन ही मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. तेव्हापासून सिमरन फरार होती. अखेर गुरुवारी सिमरनला नागपूरवरून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता सिमरनची तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

हेही वाचा >>> नागपूर : शरद पवारांमुळे पश्चिम महाराष्ट्र तर नितीन गडकरींमुळे विदर्भ भकास ; अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांचा आरोप

मुलीवर अत्याचार करणारे वडसा येथील अरविंद इंदूरकर, शिवराम हाके, राजकुमार उंदिरवाडे, मुकेश बुराडे तर लाखांदूर येथील प्रकाश परशुरामकर, सौरभ बोरकर, गौरव हरिणखेडे यांनाही पोलिसांनी अटक केली होती. सध्या लोणारे दाम्पत्यासह सर्व ९ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. आता मुख्य सूत्रधाराला अटक झाल्यामुळे आणखी काही नावे पुढे येऊन आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.