नागपूर : पुणे येथील न्यूज १० या नावाने वृत्तवाहिनीच्या नावे बनावट कागदपत्रांद्वारे विधिमंडळ सचिवालयाची दिशाभूल करत बनावट ओळखपत्र तयार करणाऱ्या कथित पत्रकार महिलेला सदर पोलिसांनी सोमवारी अखेर शताब्दी नगरातून अटक केली. सविता मंगल कुलकर्णी( साखरे) असे बनावट ओळखपत्र तयार करून फसवणूक करणाऱ्या महिला पत्रकाराचे नाव आहे. या प्रकरणातला तिचा दुसरा साथीदार नरेंद्र वारागडे याने या आधिच अटकपूर्व जामिन मिळवला आहे.

सविता मंगल कुलकर्णी आणि तिचा सहकारी असलेल्या नरेंद्र श्रीराम वैरागडे या दोघांनी नागपुरात २०२३ मध्ये झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात अधिकृत प्रतिनिधी असल्याचे बनावट नियुक्ती पत्र सादर करत माहिती व जनसंपर्क संचालनालयाकडून विधिमंडळ अधिवेशन काळात प्रवेशासाठी बनावट ओळखपत्र तयार करून घेतले होते.

नेमके काय घडले…

नागपूरात डिसेंबर २०२३ मध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होते. त्यासाठी माहिती व जनसंपर्क संचालनालयाने राज्यातील माध्यम प्रतिनिधींसाठी नोव्हेंबर महिन्यात प्रवेशपत्र प्रक्रिया सुरू केली होती. या काळात सविता कुलकर्णी आणि तिचा सहकारी नरेंद्र वैरागडे या दोघांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात आपण न्यूज १० या वाहिनीचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे नियुक्ती पत्र सादर केले. माहिती व जनसंपर्क संचालनालयाने त्या आधारे ओळखपत्र तयार करून दिले. दरम्यान अधिवेशन सुरूही झाले. मात्र अशी कोणतीही नियुक्ती संबंधित माध्यमाने केली नसल्याचे कुणकुण लागताच तत्कालिन जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके यांनी नेटवर्क १० वृत्तवाहिनीचे महाराष्ट्र आणि गोवा प्रमुख विनोदकुमार ओझा यांच्याकडे विचारणा केली होती. त्यावर झा यांनी आपल्या मार्फतच विधिमंडळाच्या अधिकृत अधिवेशनांसाठी नेमले जाणारे प्रतिनिधी नियुक्त केले जातात. मात्र आपण कुलकर्णी आणि वैरागडे अशा कोणत्याही प्रतिनिधींची नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी अधिकृत वार्ताहर म्हणून नियुक्ती केलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. या दोघांनी माहिती जनसंपर्क संचालनालयाला सादर केलेले वृत्तवाहिनीचे नियुक्तीपत्रही बनावट असल्याचे आढळले. त्यामुळे या दोघांवर यापूर्वीच २०२३मध्ये सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

२ वर्षांपासून होती फरार

या फसवणूक प्रकरणातला दुसरा आरोपी वैरागडे याने न्यायालयाकडून अटकपूर्व जामिन मिळवला. मात्र कुलकर्णीचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर सविता कुलकर्णी ही फरार होती. तिने आपले गड्डीगोदाम चौकातले घरही बदलले होते. त्यामुळे सदर पोलिस तिच्या मागावर होते. सविता कुलकर्णी ही शताब्दी नगरात भाड्याने घर घेऊन रहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला राहत्या घरातून अटक केली.