अकोला : गांधीग्राम येथील पूल क्षतिग्रस्त झाल्याने अकोला-अकोट मार्ग अनेक महिन्यांपासून बंद आहे. याच्या निषेधार्थ वंचित युवा आघाडीने लोकप्रतिनिधी हरवल्याचे फलक लावून त्यांना शोधण्यासाठी महादेवाला साकडे घातले. भाजप लोकप्रतिनिधींना शोधून आणणाऱ्यास ५१ रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करीत रविवारी वंचित बहुजन युवा आघाडीने गांधीग्राम येथे अभिनव आंदोलन केले.
अकोला-अकोट मार्ग गत अनेक महिन्यांपासून बंद आहे. अकोला-अकोट मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यावर काहीही उपाययोजना झालेली नाही. उलट तात्पुरता पूल करून वाहतूक सुरू करण्याचा दिखाऊपणा आणि त्याचेही श्रेय घेण्यासाठी उद्घाटन करण्यात येत असल्याने संतप्त युवा आघाडीने आज आंदोलन केले. आंदोलनामध्ये अकोला जिल्ह्याचे खासदार संजय धोत्रे, अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे आणि अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर हे हरविले आहेत, त्यांना शोधून देणाऱ्या ५१ रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले. शोधून आणणाऱ्यास बक्षीस देण्याच्या आशयाचे फलक आंदोलनामध्ये झळकले.
वाहतुकीसाठी बंद असलेल्या मार्गाचे काम पूर्ण होऊन तो त्वरित सामान्य जनतेसाठी खुला करण्याची मागणी वंचित युवा आघाडीने केली. यावेळी पूर्णा नदीच्या पवित्र जलाने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून साकडे घालण्यात आले. हे आंदोलन वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनात व वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे आणि जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.