बुलढाणा : चिखली एमआयडीसी परिसरातील एका लघु उद्योगात लागलेल्या आगीत उत्पादित माल जळून खाक झाल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे. काल मंगळवारी, २० मे रोजी मध्यरात्री नंतर ही आग लागली. अग्निशमन दलानी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत लाखोंचा माल भस्म झाला होता.
चिखली शहरातील नागवाणी यांचे महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत मध्ये नागवानी इंडस्ट्रीज या नावाची पत्रावळी व द्रोण तयार करणारी कंपनी आहे.काल २१ मार्चच्या मध्यरात्री तिथे अचानक भीषण आग लागल्याचे दिसून आले. सोसाट्याच्या वारा व उत्पादन सहज जळण्यासारखे असल्याने पाहतापाहता आग जोरात भडकली.
या आगीत कंपनीतील लाखो रुपयांचे साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे. दरम्यान याची माहिती मिळाल्यावर आधी चिखली नगरपरिषदेचे अग्निशमन दल बोलविण्यात आले. मात्र आग आटोक्यात येण्याची चिन्हे नसल्याने सुमारे ३० किलोमीटर अंतरावरील बुलढाणा येथील नगर पालिकेचे अग्निशमन दल देखील पाचारण करण्यात आले. तोपर्यंत भीषण आगीने संपूर्ण युनिटला विळख्यात घेतले होते.
दरम्यान चिखली व बुलढाणा दलाने जोरदार पाण्याचा मारा करून आटोकाट प्रयत्न केले. यामुळे दीर्घ संघर्षा नंतर ही आग आटोक्यात आली. मात्र तोपावेतो द्रोण, पत्रावळी, कच्चा माल, अन्य साहित्य हे जळून त्याची राख रांगोळी झाली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी पालिका अग्निशमन दलाचे प्रवीण जाधव, राहुल गवळी, पांडुरंग सोळंकी, तुषार गवई, शेख इस्माईल, अनुप खरे, सागर गवळी आणि अन्य जवानांनी अथक प्रयत्न केले.
या जवानांच्या प्रचंड मेहनतीमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले, परंतु तोपर्यंत कंपनीचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेत १२ ते १५ लाखोंचे साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र आज बुधवारी, २१ मे रोजी दुपार पर्यंत आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून यासंदर्भात तपास सुरू आहे. ही घटना औद्योगिक क्षेत्रासाठी मोठा धक्का मानली जात आहे. यामुळे उद्योजक, व्यापारी समूहात खळबळ उडाली आहे.