लोकसत्ता टीम

अमरावती : येथील कॅम्प परिसरातील आनंद लिकर वाईन शॉप या दुकानाला शनिवारी दुपारी अचानक आग लागली आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत दुकान भस्मसात झाले. आगीचे कारण कळू शकले नाही. या आगीत लाखो रुपयांची हानी झाली, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.

कॅम्प परिसरातील केशव कॉलनीत हे दारू विक्रीचे दुकान आहे. दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानकपणे आग लागली. त्यानंतर दुकानातील कर्मचारी लगेच बाहेर पडले. एका बाजूने आगीने रौद्र रुप धारण केल्यानंतर दुकानातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण ती नियंत्रणात येऊ शकली नाही. यादरम्यान, दुकानाचे संचालक अभय भांबोरे यानी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला आगीची सूचना दिली. एमएच २७ / बीएक्स ७२०२ क्रमांकाच्या वाहनातून चालक मोहम्मद फरहान, फायरमन अमोल साळुंके, योगेश साबळे घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाचे वाहन लगेच घटनास्थळी पोहचले. सुमारे चाळीस मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

आगीच्या भडक्यामुळे या परिसरातील इतर इमारतींना धोका निर्माण झाला होता, पण आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याने अनर्थ टळला. दुकानाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत बियर आणि दारूच्या बाटल्या, फ्रिज आणि दुकानातील इतर साहित्य असे मिळून अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर बिअर बार वाचविण्यात यश आले, त्याची किंमत अंदाजे ५० लाख रुपये आहे.

आगीची माहिती मिळताच केंद्र प्रमुख प्रेमानंद सोनकांबळे, फायरमन निखिल भाटे, वाहनचालक सतीश वेताळकर यांनी घटनास्थळ गाठून आग विझविण्यास मदत केली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. कॅम्प परिसरात अनेक शासकीय कार्यालये आहेत, शिवाय निवासी संकुले देखील आहेत. हे दुकान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुमारे पंधरा दिवसांपुर्वी शहरातील जवाहर गेट मार्गावरील वल्लभ‎भुवन या चिवड्याच्या दुकानाला आग लागली होती. या‎आगीत दुकानात काम करणारे दोन कामगार ‎‎भाजले होते. तसेच या दुकानासह आजूबाजूच्या‎तीन दुकानांत आगीमुळे नुकसान झाले होत. ‎अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ‎जीवाची बाजी लावत दोन कामगारांना‎ आगीतून बाहेर काढले. त्यानंतर दोन तासात‎ २५ बंब पाण्याचा मारा करून आगीवर‎नियंत्रण मिळवले होते. जवाहर गेट हा ‎‎शहरातील मुख्य बाजारपेठेचा भाग असून,‎या परिसरात नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे आगीची तीव्रता जाणवली होती.