अकोला : जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथे पुर आल्यामुळे नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह तब्बल ४८ तासांनंतर आढळला, तर पातूर तालुक्यातील दुसऱ्या घटनेत दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृतदेह पाच कि.मी. दूर २४ तासांनंतर आढळून आला आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली.
पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथे तीन तरुण मन नदीत पोहण्यासाठी गेले.

नदीत उडी घेताच तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. ते तिघेही पाण्यात वाहून जात होते. त्यातील दोन तरुणांना जिवाच्या आकांताने प्रयत्न केले. ते नदीच्या काठावर सुखरूप पोहोचले. करण वानखडे हा तरुण नदीच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी नदी काठावर गर्दी केली. नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेण्यात आला. बचाव पथकास तरुणाचा मृतदेह घटनास्थळापासून पाच कि.मी.वर आढळला. यासाठी सुनील कल्ले, उमेश आटोटे, मनीष मेश्राम व वंदे मातरम आपत्कालीन शोध व बचाव पथकाने प्रयत्न केले.
दुसऱ्या घटनेत मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथे शेतकरी मजूर महिला आपल्या मुलीसह शेतातील काम आटोपून कमळगंगा नदी ओलांडताना अचानक वाढलेल्या पाण्यामुळे मुलीसह शुक्रवारी वाहून गेली.

मुलगी एका काटेरी झुडपात अडकल्याने तिचे प्राण वाचले, महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. मूर्तिजापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. दोन मंडळात अतिवृष्टी झाली. कंझरा गावाजवळून वाहणाऱ्या कमळगंगा नदीला मोठा पूर आला. येथील रहिवासी शेतकरी मजूर महिला रेखा रमेश मते (वय ३५) व त्यांची मुलगी साक्षी रमेश मते (वय १४) नदी ओलांडताना वाहून गेल्या होत्या. मुलगी साक्षी एका झुडपाला अडकल्यामुळे तिचा जीव वाचला. महिला प्रवाहासोबत वाहून गेल्या. त्यांचा शोध घेतला जात होता.

पिंजर येथील संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाचे दीपक सदाफळे व त्यांच्या चमूकडून दोन दिवस शोध घेतल्यानंतर आज महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. कंझरा येथे कमळगंगा नदीमध्ये दीपक सदाफळे, रणजित घोगरे, विजय मालटे आदींनी शोध मोहीम राबवली. दोन दिवस ही शोध मोहीम सुरू होती. जिल्ह्यात नदीला आलेल्या पुरामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जलप्रवाहापासून दूर राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.