चंद्रपूर : सलग तीन दिवसांपासून चंद्रपूर शहरातील तापमानाचा पारा चढला असताना शुक्रवार १४ एप्रिल रोजी सायंकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला व वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. चंद्रपूर शहर तीन दिवसापासून जगात सर्वाधिक उष्ण आहे. गुरुवारी ४३.२ डिग्री सेल्सिअस तापमान नोंद घेण्यात आली तिथे आज शुक्रवारी सकाळपासून सायंकाळी सहा वाजतापर्यंत सूर्य तळपत होता.
मात्र, सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. आकाशात काळे ढग एकत्र आली. त्यानंतर ८.४५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. शहरात सर्वदूर पाऊस सुरू असल्याने सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहराच्या मुख्य मार्गाने निघालेल्या मिरवणुकीला थोडा फटका बसला. तसेच सायंकाळी न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडांगणावर सुरू असलेल्या बहुजन समाज पर्व येथे इंडियन आयडॉल सायली कांबळे यांच्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आला.