आपल्याही खात्याचा स्वतंत्र ध्वज असावा, तो वाहनांवर, कार्यालयात तोऱ्यात मिरवता यावा, अशी भावना आता जवळजवळ प्रत्येकच शासकीय खात्यात रुजू लागली आहे. पोलीस खात्यासाठी स्वतंत्र ध्वज आहे, तसाच स्वतंत्र झेंडा आता वन खात्याला लवकरच लाभणार आहे. त्याद्वारे वन खात्याची वेगळी ओळख निर्माण होईल. भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांना हा ध्वज त्यांच्या वाहनावर व वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात लावता येईल.
हा ध्वज लाल आणि हिरव्या रंगाचा आहे. वन खात्याची ओळखच हिरवा रंग असून १९८८ साली तयार झालेल्या राष्ट्रीय वननीतीत या रंगाची ओळख वन खात्याला देण्यात आली. लाल रंग ही जमिनीची ओळख आहे. सोनेरी रंगात हे सर्व चिन्हांकित असून त्यातून जंगल, हवा, पाणी, त्यांचे संरक्षण व संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे. वन खात्याच्या कार्यालयात देशाचा तिरंगा आणि वन खात्याचा ध्वज असे दोन्ही लावण्यात येतील. याशिवाय उपवनसंरक्षक, वनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या वाहनावर हा ध्वज लावण्यात येणार आहे. या पदांव्यतिरिक्त वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कक्षात हा ध्वज टेबलवर लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. लवकरच या ध्वजाचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
वैशिष्टय़..
वन खात्याला मिळणाऱ्या स्वतंत्र ध्वजाने खात्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. वन खात्याचा हा ध्वज लाल आणि हिरव्या रंगाचा आहे. त्यावर राजमुद्रेसह ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे वन खात्याचे ब्रीद अंकित आहे.