नागपूर – काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह अन्य पक्षातील दहा माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा या पक्षाकडून करण्यात आला होता. पण दुसऱ्याच दिवशी दहापैकी पाच माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेशाचा दावा फेटाळला व आम्हाला न विचारताच आमची नावे यादीत टाकण्यात आली असा दावा केला. त्यामुळे सत्ताधारी शिंदे गटावर नामुष्कीची वेळ आली आहे.
शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांच्या उपस्थितीत नागपुरातील रविभवनात दोनच दिवसापूर्वी एक पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. याचे प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले, त्यात विविध पक्षाच्या दहा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यात उद्धव ठाकरे गट, भाजपा, कांग्रेस, बसपा, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांची नावे देण्यात आली होती. हा दावा दुसऱ्याच दिवशी खोटा ठरला. दहा पैकी पाच माजी नगरसेवकांनी ते शिंदे गटात सहभागी झाले नाही, असे स्पष्ट केले. यात प्रामुख्याने परसराम बोकड़े, भास्कर बर्डे, भीमराव नंदनवार, जीजा धकाते व दुर्गा रेहपड़े या माजी नगरसेवकांचा समावेश आहे. ते म्हणाले,आम्हाला वर्तमान पत्रातून ही बातमी कळली. आ्मच्याशी शिंदे गटाच्या एकाही नेत्याने चर्चा केली नाही किवा साधी विचारणा सुद्धा केली नाही. ज्यावेळी हा पक्ष प्रवेश झाला त्यावेळी वरील पाचही माजी नगरसेवक तेथे अनुपस्थित होते. याबाबतविचारणा केली असता त्यांनी ते कार्यव्यस्ततेमुळे येऊ शकले नाही, असे सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर, माजी नगरसेविका पुष्पा मलिकर यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. या कार्यक्रमाला शिंदे गटाचे शहर प्रमुख, जिला प्रमुख, संपर्क प्रमुख आणि पूर्व विदर्भ संपर्क प्रमुखांनाही निमंत्रित करण्यात आले नव्हते. एकूणच भाजपच्या बालेकिल्ल्यात दहा माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश घडवून आणून शिंदे गटाने भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांच्या वाट्याला नामुष्की आली. पक्षांतर्गत गटबाजीमुळे हा प्रकार घडल्याची शिंदे गटात चर्चा आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या वेळी हा कार्यक्रमझाला होता. त्यामुळे सर्वांचे लक्षयाकडे होते. पण हा फुसका बार ठरला.