अकोला : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना न्यायालयाने शनिवारी दोन वर्षांची शिक्षा व सात हजार रुपये दंड ठोठावला. तब्बल २३ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. गावंडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत.

शहरातील अग्रसेन चौकात कर्तव्यावरील वाहतूक पोलीस संतोष गिरी यांच्याशी १६ डिसेंबर १९९९ रोजी गुलाबराव गावंडे यांनी वाहन अडवल्यावरून वाद घातला. यावेळी शिवीगाळदेखील केली होती. पोलीस कर्मचारी गिरी यांच्या तक्रारीवरून रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुलाबराव गावंडे यांच्यासह राजू मधुकर मेतकर, गजानन नामदेव बचे, हरिनारायण रामराव गावंडे अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणातील सुनावणीनंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.डी.गव्हाणे यांनी सबळ पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना कलम ३५३ अन्वये दोन वर्षांची शिक्षा, पाच हजार दंड व कलम २९४ अन्वये दोन हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. इतर तीन आरोपींना पुराव्याअभावी न्यायालयाने सुटका केली. सरकार पक्षाच्यावतीने ॲड. दीपक गोटे यांनी बाजू मांडली.