बोईंग-आयआयटी राष्ट्रीय एरोमॉडेलिंग स्पर्धा

हवाईक्षेत्रात मुशाफिरी करायची असेल तर ‘एरोमॉडेलिंग’ ही त्याची पहिली पायरी आहे. या क्षेत्रात नागपूरच्या चार विद्यार्थ्यांनी नवी दिल्ली येथे २२ एप्रिलला झालेल्या बोईंग राष्ट्रीय स्पर्धा २०१६ मध्ये पहिले स्थान प्राप्त केले. पारितोषिक स्वरूपात एक लाख रुपयांचे ते मानकरी ठरले. सलग दोन वर्षांपासून या चमूने विजेतेपद कायम राखले आहे.

२०१४ साली बोईंग-आयआयटी राष्ट्रीय एरोमॉडेलिंग स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा सुरू करण्यामागे देशभरातील विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकासाला चालना देणे आणि या क्षेत्राविषयी जागरूकता वाढवणे हा उद्देश होता. दोन टप्प्यात ही स्पर्धा घेण्यात येते. पहिल्या टप्प्यात क्षेत्रीय स्तरावर आयआयटीच्या मुंबई, मद्रास, कानपूर आणि खडगपूर केंद्रावर स्पर्धा होते. यातून प्रत्येक क्षेत्रातून पहिल्या तीन चमूची निवड आयआयटी दिल्ली येथे आयोजित अंतिम स्पध्रेकरिता केली जाते. यंदा या स्पध्रेत देशातील ३०० महाविद्यालयांमधून ८०० स्पर्धक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना विमान बांधणी आणि उड्डाण तसेच रेडिओ कंट्रोल या परीक्षेतून जावे लागते. क्षेत्रीय स्तरावर दोन फेऱ्या होतात. यात विमान २० सेकंदाकरिता उडवणे आणि जमिनीला स्पर्श करण्यापूर्वी यंत्र बंद करून अधिकाधिक वेळ हवेत ठेवणे. त्यानंतर विमानाने एखादी वस्तू सोबत घेऊन जमिनीवर चिन्हांकित लक्ष्यापर्यंत ती पोहचवणे. तसेच चार मिनिटांत अधिकाधिकवेळा तीन अडथळे पार करून विमान उडवणे.

अंतिम फेरीतही जवळपास सारखेच लक्ष्य दिले जाते. दोन्ही फेऱ्यांमधील कामगिरीच्या आधारावर गुण दिले जातात. यंदाच्या स्पर्धेत या सर्व स्पर्धामध्ये नागपूरकर विद्यार्थी अव्वल ठरले. गेल्यावर्षी या विद्यार्थ्यांनी आयआयटी कानपूरमधून सहभाग घेतला होता आणि दुसरा क्रमांक प्राप्त केला होता. आयआयटी खडगपूरमधून त्यांनी सहभाग घेतला आणि राष्ट्रीय अंतिम स्पध्रेत पहिला क्रमांक प्राप्त केला.

दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पध्रेत बोईंग इंडियाचे अध्यक्ष प्रत्युषकुमारही उपस्थित होते. एरोस्पेस उद्योगातील विकास वेगाने होत आहे आणि येथे एरोनॉटिकल विद्यार्थ्यांची गरज वाढत आहे, असे ते म्हणाले.

अडथळे पार करत यश संपादन

अंतिम स्पध्रेत आमची अडचण आणखी वाढली, कारण वादळी वारा आणि ईगल्स विमान मध्येमध्ये येत होते. आधी स्पध्रेतील अडथळे पार करायचे होते. आम्ही आमचे लक्ष्य यशस्वीपणे पूर्ण केले, असे या चमूने सांगितले. गौरव जोशीने या चमूचे नेतृत्व केले. त्यात मोहित रंगलानी, सुमित चौरे आणि निरज खट्टर या तीन विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे सर्व विद्यार्थी प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एरोनॉटिकल शाखेचे विद्यार्थी आहेत. गौरव जोशी हा सुवर्णपदक विजेता असून या क्षेत्रात त्याने १५ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहे.