चंद्रपूर: गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळाल्यापासून किंबहुना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. गोळीबार, चाकू, तलवारींचे हल्ले अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात अनेकांना जीवदेखील गमवावा लागला आहे.

औद्योगिक जिल्हा असलेला चंद्रपूर हा अतिशय शांत जिल्हा म्हणून राज्याच्या राजकारणात ओळखला जात होता. सर्व जिल्ह्यांप्रमाणे येथेही विविध राजकीय पक्षांमध्ये सक्रिय नेत्यांमध्ये गटबाजी होती व आहे. मात्र या जिल्ह्यात यापूर्वी कधीच राजकीय नेत्यांनी गुन्हेगारांना आश्रय मिळवून दिला नाही. मात्र २०१४ नंतर जिल्ह्यातील राजकारण अतिशय वेगाने बदलत गेले. अशा घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. ही हिम्मत आली कुठून तर राजकारण्यांनी पोसून ठेवलेल्या गावगुंडांमुळे व राजकारण्यांनी या गावगुंडांना पक्षात प्रवेश दिला तेव्हापासून गुन्हेगारी वाढीस लागली आहे.

हेही वाचा – गोंदिया विधानसभेवर विद्यमान अपक्ष आमदारासह यांचाही दावा

कोळसा, वाळू, दारू, गुटखा, क्रिकेट ऑनलाइन सट्टा या सर्व अवैध व्यवसायांना राजकारण्यांसोबतच प्रामाणिक अधिकारी वगळता पोलीस दलातील काही अप्रामाणिकांचा आशीर्वाद आहे. त्यातूनच गोळीबार, चाकू हल्ले, तलवार व टोळी युद्धासारख्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. गुरुवारी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या रघुवंशी कॉम्पलेक्समध्ये गोळीबार झाला. विशेष म्हणजे गोळीबार करणारा अतिशय आरामात कॉम्पलेक्समध्ये आला व सर्वादेखत त्याने अंधेवार यांच्यावर गोळी झाडली.

अंधेवार हा काही धुतल्या तांदळाचा नाही. या गोळीबाराचा थेट संबंध २०२० मध्ये बल्लारपुरातील अवैध कोळसा व्यवसायात गुंतलेल्या सूरज बहुरिया हत्याकांडाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. बहुरिया याला कुणाचा राजकीय आशीर्वाद होता हे सर्वश्रृत होते. गोळीबारातून घडलेले बहुरिया हत्याकांड किंवा अमन अंधेवार यांच्यावरील गोळीबारच नाही तर यापूर्वी देखील गोळीबार व हल्ल्याच्या अनेक घटना या जिल्ह्यात घडलेल्या आहेत. घुग्घुस येथे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष कमटम याची रस्त्यावर तलवारीने वार करून हत्या करण्यात आली होती. त्याचबरोबर माजरी येथे मनसे नेता सूर याची हत्या झाली होती.

हेही वाचा – नागपूर ‘एम्स’ला वारंवार जाहिरात देऊनही तज्ज्ञ डॉक्टर मिळत नाही! काय आहे कारण जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर मूल शहरात गोळीबार झाला. या गोळीबारातील आरोपी आजही तुरुंगात आहेत. २४ जुलै २०२३ रोजी राजुरा येथे पूर्वशा डोहे हिच्यावर तर घरात गोळी चालली. यात तिचा मृत्यू झाला. ३१ जानेवारी २०२१ मध्ये राजू यादव याची हत्या गोळीबारातून झाली. ८ ऑगस्ट २०२० मध्ये सुरज बहुरिया याची हत्या झाली तर शिवा वझरकर या युवा शिवसैनिकाची अशीच हत्या वर्षभरापूर्वी झाली. विशेष म्हणजे, या सर्व हत्यांमध्ये कुठे ना कुठे अवैध व्यवसाय व राजकारणाचा संबंध आहे. या सर्व घटना बघता चंद्रपूर जिल्हा एका वेगळ्याच वाटेने निघाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील सर्व पक्षीय राजकारणी तथा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी राजकीय आशीर्वाद प्राप्त गुन्हेगारांना दूर सारून कडक शिक्षा केली तरच चंद्रपूरला गतवैभव प्राप्त होईल, अन्यथा गुन्हेगारांचे चंद्रपूर अशी ओळख झाल्याशिवाय राहणार नाही.