यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध प्रकारच्या सुविधा आपण उपलब्ध करुन देतो आहे. पालकमंत्री झाल्यापासून आतापर्यंत जवळपास १०० कोटीपर्यंतचा निधी देण्यात आला आहे. तरीही, रुग्णाच्या अडचणी, मिळणाऱ्या सुविधांबाबत वारंवार तक्रारी येतात, ही गंभीर बाब असल्याचे सुनावत मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाची कानउघाडणी केली.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेतला. महाविद्यालयात कार्यरत डॉक्टरांनी रुग्णांना अधिक चांगली सेवा दिली पाहिजे. वरिष्ठ डॉक्टरांनी स्वतः ओपीडीला उपस्थित राहुन रुग्ण तपासणी करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी दिले.

वैद्यकीय महाविद्यालय वसंतराव नाईक साहेबांच्या नावाने आहे. जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणावर रुग्ण येथे येतात. त्यामुळे येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी मागील काळात वेगवेगळ्या योजनांमधून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन दिला. भविष्यातही महाविद्यालयाच्या सुविधांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. महाविद्यालयाचे स्थानिक स्तरावरील प्रश्न सोडवू, इतर विषयांसाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

वैद्यकीय महाविद्यालयाला अत्याधुनिक एमआरआय मशिन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आवश्यक बाबींची पूर्तता करुन मशिन या महिनाअखेर सुरु करावे. रात्रीच्या वेळी शवविच्छेदन होत नसल्याने मृत व्यक्तींच्या नातेवाईकांची मोठी अडचण होते, त्यामुळे सायंकाळी ६ नंतर देखील शवविच्छेदन करण्यात यावे. तसेच आठवड्याच्या आत शवविच्छेदन अहवाल उपलब्ध करुन द्यावा. दिव्यांग मंडळ आणि वैद्यकीय मंडळातील अधिकारी, डॉक्टरांची यादी दर्शनी भागावर लावण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.

महाविद्यालयातील ज्या विभागांचे पोस्ट ग्रॅज्युएशन बंद झाले आहे, ते सुरु करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावे. महाविद्यालयाला उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सर्व यंत्रसामुग्रीचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. महाविद्यालयात बीएससी नर्सिंग व जीएनएम अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शासनास सादर केलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करु, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील स्वच्छता, सुरक्षा, रुग्णांचा पोषण आहार, सिकलसेल रुग्णांसाठी उपलब्ध सुविधा, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, महाविद्यालयाचे दैनंदिन कामकाज आदींचा सविस्तर आढावा घेतला.

बैठकीनंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी महाविद्यालय व तेथील विविध सुविधांची पाहणी केली. त्यात नवजात मुलांना अतिदक्षता कक्ष, अतिदक्षता बालरोग कक्ष, महिला विभागासाठी तयार करण्यात आलेले शस्त्रक्रियागृह, नव्याने बांधण्यात आलेला एमआरआय कक्ष, सीटी स्कॅन कक्ष, बाह्यरुग्ण विभाग, शल्यक्रिया अतिदक्षता विभाग आदींची पाहणी केली.

खनिज विकास व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सुविधांची देखील त्यांनी यावेळी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीष जतकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेंद्र भुयार, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने, कार्यकारी अभियंता विक्रम शिरभाते यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नातेवाईकावर रुग्णांना स्ट्रेचरवर नेण्याची वेळ का येते?

बाह्यरुग्ण कक्षात वरिष्ठ डॉक्टर उपस्थित राहिले पाहिजे. रुग्णांना सोनोग्राफी, शस्त्रक्रियांसाठी जास्त दिवस प्रतिक्षेत रहावे लागू नये, असे नियोजन करा. डॉक्टर आणि त्यांचे ओपीडीचे दिवस व वेळ दर्शनी भागावर लावण्यात यावे. नोंदणीसाठी रुग्णांना रांगेत रहावे लागते, त्यात त्यांचा वेळ जातो, त्यामुळे नोंदणी कक्ष वाढविता येईल का? याची तपासणी करावी. बरेचदा रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर ओढत न्यावे लागत असल्याच्या बातम्या येतात. असे होता कामा नये, झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. याचवेळी एक नातेवाईक रुग्णास स्ट्रेचरवर नेत असल्याचे, आढळल्याने पालकमंत्री चांगलेच संतापले.