गडचिरोली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून उमेदवारांसाठी चाचपणी सुरू आहे. मात्र, काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये गडचिरोलीच्या नगराध्यक्ष पदासाठी बाहेरील महिला उमेदवाराला संधी देण्यासंदर्भात सुरु असलेल्या चर्चेमुळे पक्षांतर्गत कलह वाढण्याची चिन्हे आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वर्चस्व स्थापन करण्याचे भाजपपुढे आव्हान आहे. तर जिल्ह्यात एक खासदार आणि आमदार असलेल्या काँग्रेसवरही सर्वोच्च प्रदर्शनाचे दडपण आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुने नेते सुरेश पोरेड्डीवार आणि त्यांच्या पत्नीला प्रवेश देत काँग्रेसने नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही जाहीर केला. मात्र, यामुळे पक्षांतर्गत निष्ठावंत नाराज असून निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहे. दुसरीकडे भाजपच्या गोटातही नगराध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच दिसून येत आहे. असे असताना एक गट राजकीय समीकरणाचा दाखला देत बाहेरील उमेदवाराला संधी देण्याची मागणी करीत आहे. तर दुसरा गट पक्ष आणि परिवारातील निष्ठावंत सदस्यांनाच संधी मिळाली पाहिजे यासाठी आग्रही आहे. एकेकाळी काँग्रेस पक्षात असलेले गटबाजीचे ग्रहण आता भाजपला लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे माजी खासदार, जिल्हाध्यक्ष, माजी आमदार आणि विद्यमान आमदार यांच्यात उमेदवार ठरविण्यावरून सुरु असलेली कुरघोडी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हेच चित्र पाहायला मिळाले होते. यावरून पक्षश्रेष्ठींनी गटबाजी करणाऱ्यांचे कानही टोचले होते. तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फटका बसल्यास अनेकांचे राजकीय भविष्य धोक्यात येऊ शकते, अशी चर्चा आहे.
बंडखोरी रोखण्याचे आव्हान
सत्ता स्थापनेसाठी सर्वच पक्षांमध्ये स्पर्धा दिसून येत असली तरी काँग्रेस आणि भाजपची भूमिका सर्वात महत्वाची ठरणार आहे. त्यात युती आणि आघाडीचे अद्याप ठरले नसल्याने ऐनवेळेवर जागा वाटपावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे आहे. सोबतच पक्षांतर्गत नाराजांची समजूत न काढल्यास बंडखोरी अटळ आहे. काहींनी तर तशी तयारी सुद्धा केल्याचे कळते. त्यासाठी राजकीय आणि जातीय समीकरणाची जुळवाजुळव सुरूही केले आहे. त्यामुळे सर्व पक्षांपुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान राहणार आहे.
