गडचिरोली : जिल्ह्यातील दक्षिणेत सूरजागड टेकडीवर यशस्वीरीत्या लोहखनिज उत्खनन सुरू केल्यानंतर प्रशासन उत्तर भागात कोरची तालुक्यातील झेंडेपार टेकडीवर उत्खनन करण्याकरिता १० ऑक्टोबरला जनसुनावणी घेणार आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये रोष असून याविरोधात त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तर लोकांना विश्वासात न घेता नियमबाह्य जनसुनावणी घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दिला आहे. त्यामुळे या खाणीवरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात एकूण २५ खाणी प्रस्तावित आहे. त्यापैकी १३ खाणी दक्षिण तर १२ उत्तर गडचिरोलीच्या आदिवासी बहुल भागातील आहेत. ग्रामसभा व स्थानिक आदिवासींच्या विरोधानंतर देखील दक्षिणेतील एटापल्ली तालुक्यात सूरजागड टेकडीवर मागील दोन वर्षांपासून लोहखनिज उत्खनन सुरू आहे. याच टेकडीवर पुन्हा पाच ठिकाणी उत्खनन करण्यासंबंधी कंत्राट सुध्दा देण्यात आले आहे. त्यामुळे आता उर्वरित खाणी सुरू करण्याबाबत काही कंपन्या उत्सुक आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील झेंडेपार टेकडीवरील ४६ हेक्टरवर प्रस्तावित लोहखाणीत उत्खनन सुरु करण्यासाठी पाच कंपन्यांनी अर्ज केला आहे.

हेही वाचा : नागपुरात ‘डेंग्यू’च्या प्रकोपातही महापालिका, मेडिकल, मेयोत समन्वय नाही; चाचणीसाठी टोलवाटोलवी

यासाठी प्रदूषण मंडळाकडून १० ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरणविषयक जनसुनावणी आयोजित केली आहे. परंतु याभागातील ग्रामसभा, स्थानिक आणि आदिवासी नागरिकांचा या खाणीला प्रचंड विरोध आहे. २०१७ रोजी देखील यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, नागरिकांच्या विरोधामुळे ही सुनावणी रद्द केल्या गेली. तत्पूर्वी २०११ मध्ये नागरिकांनी मोठे आंदोलनदेखील केले होते. स्थानिक नागरिक, ग्रामसभा यांची परवानगी न घेता प्रशासन लोहखाणीत उत्खननाकरिता कशी काय परवानगी देतात, असा आक्षेप येथील ग्रामससभांनी घेतला आहे.

हेही वाचा : नागपूर ‘एम्स’मध्ये ‘स्पाइनल कॉर्ड इंज्युरी टेलि’ पुनर्वसन केंद्र

काही महिन्यांपूर्वी झेंडेपार येथे पार पडलेल्या रावपाट गंगाराम यात्रेत तालुक्यातील २ इलाख्यातून आलेल्या ९० ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी एक बैठक घेत खाणविरोधी भूमिका मांडली. उत्खननामुळे आदिवासींनी जपून ठेवले पारंपरिक जंगल, गौण वनउपज नष्ट होतील. सोबतच आदिवासींचे देव देखील संकटात येतील. अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली होती. ‘सूरजागडमध्ये स्थानिकांचा विरोध डावलून, पेसा सारखे कायदे पायदळी तुडवून बळजबरीने खाण सुरू करण्यात आली. आज तो परिसर आणि त्याभागातील जंगल उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. रोजगार आणि विकास केवळ कागदावर आहे. ती परिस्थिती आमच्या भागात नको. म्हणून आमचा विरोध आहे. विकास करायचा असेल तर आधी येथील पायाभूत सुविधा सुधारा. लवकरच समितीची बैठक घेऊन पुढील भूमिका जाहीर करू’, असे क्रांती केरामी (माजी जि.प. सदस्य तसेच अध्यक्ष सर्व पक्षीय लोहखाणविरोधी समिती, कोरची) यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : VIDEO : अखंड भारत कधीपर्यंत होईल? मोहन भागवतांनी मांडलं मत; म्हणाले…

तर ‘स्थानिकांना विश्वासात न घेता गडचिरोली जिल्ह्यातील लोहखाणी सुरू करणे चुकीचे आहे. मागील वेळेस ज्याप्रकारे जनसुनावणी घेण्यात आली. त्यावरून प्रशासन कुणाच्या तरी दबावात काम करत आहे, हे स्पष्ट होते. मात्र, झेंडेपार येथील प्रस्तावित जनसुनावणी प्रभावित क्षेत्रात न घेतल्यास याविरोधात मी स्वतः न्यायालयात जाणार’ असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी म्हटले आहे.