गडचिरोली : मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. नाल्यांवर पुल नसल्याने नागरिकांना गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. ऐन पोळ्याच्या सणाच्या तोंडावर सहा वर्षीय बालक आणि एका ३६ वर्षीय व्यक्तीचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ही तालुक्यात पाच दिवसांत नोंदवलेली चौथी अशा प्रकारची दुर्दैवी घटना आहे. रिशान प्रकाश पुंगाटी (वय ६, रा. कोयार) आणि टोका डोलू मज्जी (वय ३६, रा. भटपार, मूळगाव हालेवाडा, ता. बैरमगड, जि. बीजापूर, छत्तीसगड) यांचा समावेश आहे.

सणाच्या दिवशी काळाने गाठले

रिशान हा लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत पहिलीत शिकत होता. पोळा सणानिमित्त गुरुवारी (दि. २१ ऑगस्ट) वडिलांनी त्याला गावी आणले होते. काही वेळाने खेळायला बाहेर गेलेल्या रिशानचा बराच वेळ झाला तरी पत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध सुरू केला. मात्र तो आढळून आला नाही. शुक्रवारी सकाळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा शोधमोहीम हाती घेतली असता गावाजवळील नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला.

नाल्यावर पूल नसल्याने आणि पुराच्या पाण्याचा प्रवाह वाढलेला असल्याने शोध मोहिमेला अडथळे निर्माण झाले. मृतदेह काढताना ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “दरवर्षी पावसात हीच अवस्था होते. मुलं, महिला, वृद्धांना धोका असूनही प्रशासन निष्क्रिय आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक ग्रामस्थांनी दिली.

मिरगीच्या झटक्याने आयुष्याची अखेर

दुसऱ्या घटनेत भटपार येथील टोका डोलू मज्जी या व्यक्तीचा मिरगीचा झटका येऊन नाल्यात बुडून मृत्यू झाला. तो संध्याकाळी एकटाच आंघोळीला गेला होता. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. महसूलसेवक सुरेश मज्जी यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली व दोन मुले असा परिवार आहे.

पाच दिवसांत चार मृत्यू; प्रशासन झोपेत

भामरागड तालुक्यातील पूरपरिस्थिती गंभीर बनली असून पायाभूत सुविधांचा अभाव मृत्यूचे कारण ठरत आहे. १८ ऑगस्ट रोजी कोडपे येथील १९ वर्षीय युवक लालचंद लकडा खंडी नाला ओलांडताना वाहून गेला. त्याच दिवशी जोनावाहीचे रहिवासी व मुख्याध्यापक वसंत सोमा तलांडे यांचाही नाल्यात बुडून मृत्यू झाला. आणि आता रिशान व टोका यांच्या मृत्यूने ही संख्या चारवर गेली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांच्या जिवावर

गावांमध्ये पूल, रस्ते, वीज, आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष जाणवत आहे. मुसळधार पावसात या गरजांचे महत्त्व अधोरेखित होत असून, नियोजनाचा अभाव आणि कार्यवाहीचा अभाव हेच अशा दुर्दैवी घटनांचे मूळ असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.