गडचिरोली : विनापरवाना कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर धाड टाकून कारवाई करण्यात आल्याने काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कृषी विभागाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. त्यावरून शहरातील तिरुपती कृषी केंद्रातील विक्री बंद करून महिन्याभरात खुलासा सादर करण्याचे निर्देशीत करण्यात आले आहे.
मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी खते व कीटकनाशकांचा काळाबाजार होत असल्याची ओरड सुरु आहे. यावरून कृषी विभागाने अनेक केंद्राना नोटीस बजावली आहे. तरीही काही केंद्रावर अद्याप काळाबाजार सुरु असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शहरातील आरमोरी मार्गावरील तिरुपती कृषी केंद्रातून विनापरवाना कीटकनाशकांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना मिळाली. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कृषी विभागातील अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या.
१६ सप्टेंबरला अधिकाऱ्यांनी संबंधित केंद्रावर धाड टाकून तपासणी केली असता त्याठिकाणी विनापरवाना कीटकनाशकांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित केंद्रावर कीटकनाशक विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोबतच नोटीस बजावून महिनाभराच्या आत खुलासा करण्याचे निर्देशित केले आहे. उपविभागीय अधिकारी रणजीत यादव यांनी कारवाईनंतर पंचनामा करून वरील आदेश निर्गमित केले आहे. संबंधित केंद्र संचालकाकडून समाधानकारक उत्तर प्राप्त न झाल्यास कडक कारवाई करण्याचा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहे.
..तर कृषी केंद्रांना कायमस्वरूपी टाळे
खते व कीटकनाशकांच्या काळाबाजारासंदर्भात प्रशासनाकडून वारंवार कृषी केंद्रांना इशारा देण्यात येत आहे. तरीही जिल्ह्यातील काही केंद्रांवर हा प्रकार सुरू असल्याचे समोर येत आहे. काहीजण विनापरवाना कीटकनाशक व कृषी साहित्यांची विक्री करत असल्याच्याही तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यात यापुढे असे एकही केंद्र आढळल्यास त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून केंद्राला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.