गडचिरोली : गेल्या काही वर्षात गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिकीकरणाला चालना मिळाल्याने अवजड वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या वाहनांसाठी लागणाऱ्या इंधनाची विक्री देखील दहा पटीने वाढली. हीच संधी साधून काही गुजरातच्या इंधन माफीयांनी स्थानिकांना हाताशी घेत सर्रास अवैध बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा सुरु केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे दरवर्षी शासनाचा शेकडो कोटींचा महसूल बुडत आहे.
लोह खनिजावर आधारित उद्योग आकाराला येत असल्याने गडचिरोली जिल्ह्यात विकासासह मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहे. मालवाहतुकीमुळे दररोज हजारावर अवजड वाहने येथील रस्त्यांवरून धावत असतात. त्यामुळे वाहतूक व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज भासत असते. परिणामी गेल्या तीन वर्षात इंधन विक्रीच्या प्रमाणात दहापटीने वाढ झाली आहे. मात्र, यासोबत अवैध ‘बायोडिझेल’ विक्री रोखण्याचे प्रशासनासमोर नवे आव्हान उभे झाले आहे. याच क्षेत्रातील एका व्यवसायिकाने नाव न छापण्याचा अटीवर दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील जामनगर आणि वापी भागातील काही कंपन्यानी मोठ्या अधिकाऱ्यांना व राजकारण्यांना हाताशी घेत ‘इंडस्ट्रीयल ऑइल’ पुरवठा करण्याचा नावावर जिल्हाभरात अवैध बायोडिझेल विक्री सुरु केली आहे.
मागील तीन वर्षपासून हा गोरखधंदा सुरु असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाला शेकडो कोटींचा फटका बसत आहे. दररोज थेट गुजरातमधून या अवैध बायोडिझेलचे टँकर गडचिरोलीत दाखल होत आहेत. त्यामुळे इंधनविक्रीची एक छुपी समांतर यंत्रणा उभी झाली आहे. यात थेट मोठ्या व्यावसायिकांना आणि मोठ्या पेट्रोल पम्प चालकांना या डिझेलची विक्री करण्यात येते. यातून एका लिटरमागे तब्बल १५ ते २० रुपायचा नफा संबंधित विक्रेत्याला मिळतो. तर टँकरमागे हाच नफा ५ ते ८ लाख इतका होतो. त्यामुळे अनेकजण या अवैध धंद्यात गुंतल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही राज्यातील विविध भागात अशा प्रकरणांमध्ये कारवाई झालेली आहे.
पूर्व विदर्भात व्याप्ती, शेकडो कोटींची उलाढाल
अवैध बायोडिझेल विक्री केवळ गडचिरोलीतच नसून पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात याची व्याप्ती आहे. ज्या भागात उद्योग धंदे वाढीस लागते त्या भागात हा व्यवसाय उभा राहतो. चंद्रपूर याचे केंद्र असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या बायोडिझेल विक्रीसाठी १२ हून अधिक पारवाने लागतात आणि त्यात नफा इतका नाही. त्यामुळे अनधिकृत रसायन एकत्र करून हे अवैध बायोडिझेल बनविल्या जाते. यातून महिन्याकाठी शकेडो कोटीची उलाढाल होत असते. त्यामुळेच मागील तीन वर्षापासून या डिझेल माफियांनी गडचिरोलीकडे लक्ष वळवले आहे. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपातील डिझेलची प्रामाणिकपणे तपासणी केल्यास हा प्रकार समोर येऊ शकतो पण तसे होताना दिसत नाही.
या प्रकारासंदर्भात माझ्याकडे अधिक माहिती नाही. यासंदर्भात संबंधित विभागाला चौकशीच्या सूचना केल्या आहे. तथ्य आढळ्यास कारवाई केली जाईल. – अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी