गडचिरोली : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयामागील झुडपी जंगलाची जागा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सुरवातीला मंजूर जागेत कृषी महाविद्यालयाची १५ एकर जागा येत असल्याने अधिग्रहनावरून वाद सुरु आहे. त्यात काँग्रेसने उडी घेतल्याने हा वाद अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत. तब्बल दोन दशकांच्या मागणीनंतर गडचिरोली जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली. महाविद्यालय सुरू होऊन आता वर्ष होत आले. मात्र जागेचा तिढा न सुटल्याने इमारतीचे बांधकाम रखडले आहे.
त्यामुळे सुविधेअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पहिल्यांदा जेव्हा जागेसाठी चाचपणी करण्यात आली तेव्हा जिल्हा सामान्य रुग्णालयलगत असलेली कृषी महाविद्यालयाची १५ एकर जागा अधिग्रहित करण्याचे ठरले होते. मात्र, यामुळे कृषी महाविद्यालयाच्या मान्यतेवरच गदा येणार असल्याने इतरत्र जागेच शोध घेण्यात येत आहे. परंतु माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी जुन्या मंजूर जागेवरच बांधकाम करावे असा आग्रह धरला आहे. तर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी रुग्णालयामागील झुडपी जंगलाची जागा अधिग्रहित करण्यात यावी, असे सुचवले आहे.
त्यासंदर्भात प्रशासकीय स्तरावर हालचाली देखील सुरु झाल्या आहे. यासाठी मुख्यमंत्री देखील अनुकूल आहे. मात्र, यामुळे महाविद्यालयाच्या बांधकामात विलंब होत आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ झुडपी जंगलाच्या जागेला मंजुरी द्यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे. काही दिवसापूर्वीच तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेल्या विकासकामात आणि कंत्राटी भरतीत अनियमितता झाल्याच्या आरोपावरून वैद्यकीय महाविद्यालय चर्चेत आले होते.
सहपालकमंत्र्यांमुळे विकासात अडथळा
सहपालकमंत्र्यांनी शाळा बांधकाम व दुरुस्तीच्या मंजूर कामांना स्थगिती देण्याचे आदेश दिल्यानंतर १२ सप्टेंबरला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या स्थगिती आदेशामुळे शैक्षणिक विकासात अडथळा निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. राज्यातील क्रमांक एकाचा जिल्हा बनविण्याचे आपले स्वप्न आहे, पण स्थगिती आदेशामुळे दुर्गम, अतिदुर्गम भागातील शैक्षणिक प्रगती खुंटली असल्याचे पत्रात नमूद आहे.