गडचिरोली : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जहाल महिला नक्षल नेता तारक्कासह ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. यानंतर ८ जानेवारीला आणखी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी हिंसक चळवळ सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतल्याने नक्षल चळवळीला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

कंपनी क्र. १० ची सेक्शन कमांडर शामला झुरु पुडो उर्फ लीला (३६,रा. गट्टेपल्ली ता. एटापल्ली) व भामरागड दलम सदस्य काजल मंगरु वड्डे उर्फ लिम्मी (२४,रा. नेलगुंडा) अशी त्यांची नावे आहेत. या दोघींवर मिळून तब्बल ५३ गुन्हे नोंद असून दहा लाखांचे बक्षीस होते. १ जानेवारीला जहाल नक्षलवादी नेता व केंद्रीय समिती सदस्य भूपती याची पत्नी विमला चंद्रा सिडाम उर्फ तारा उर्फ वत्सला उर्फ तारक्का हिच्यासह ११ जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर आता आणखी दोन महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. शामला पुडोवर महाराष्ट्र सरकारचे ८ लाखांचे तर काजल वड्डेवर दोन लाखांचे बक्षीस होते. आत्मसमर्पणानंतर केंद्र व राज्य सरकारकडून या दोघींना पुनर्वसनासाठी अनुक्रमे साडेपाच लाख व साडेचार लाख रुपये असे बक्षीस मिळणार आहे. २०२२ पासून आतापर्यंत एकूण ४६ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

हेही वाचा – बुलढाणा : वाळू तस्करांचा हैदोस, तलाठ्यावर चक्क टिप्पर घालून…

नक्षलविरोधी अभियानचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, राज्य राखीव दलाचे उपमहानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, राज्य राखीव दलाच्या ११३ बटालियनचे कमांडंट जसवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण मोहीम सुरु आहे.

हेही वाचा – रस्ते, उड्डाणपुलांमुळे प्रसिद्ध नागपुरात एक रस्ता असाही आहे जो २५ वर्षापासून…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वयाच्या १४ व्या वर्षी शामला नक्षल चळवळीत

शामला पुडो ही २३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या दंडकारण्य स्पेशल झोन कमिटी सदस्य रुपेश मडावी ऊर्फ सांबा याची पत्नी आहे. २००२ मध्ये ती चामोर्शी दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली. तेव्हा ती जेमतेम १४ वर्षांची होती. पुढे २००७ पर्यंत तिने प्लाटून क्र. ७ मध्ये काम केले. २००७ मध्ये तिची बदली कंपनी क्र. ४ मध्ये झाली. २००८ मध्ये ती पीपीसीएम पदावर पदोन्नती घेऊन सेक्शन कमांडर म्हणून कंपनी क्र. ४ मध्ये आली. २०१० मध्ये तिची कंपनी क्र. १० मध्ये बदली झाली. तेव्हापासून ती सेक्शन कमांडर या पदावर कार्यरत होती. तिच्यावर ४५ गुन्हे नोंद असून यात २१ चकमक, ६ जाळपोळ व इतर १८ गुन्ह्यांचा समावेश आहे. काजल मंगरु वड्डे ही जानेवारी २०१८ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली. याच दलममध्ये ती आतापर्यंत कार्यरत होती. कारकिर्दीत तिने ८ गुन्हे केले. यात ४ चकमक, १ जाळपोळ व ३ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.