गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशात आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासनाकडून पूरग्रस्त भागातील नागरिकांना वेळोवेळी सावधगिरी बाळगण्याची सूचना करण्यात येत आहे. मात्र, अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन धोकादायक नावेतून आपत्ती व्यवस्थापनाचे नियम धाब्यावर बसवून केलेली पूर पाहणी जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरली आहे.

दरवर्षी होणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण होत असते. यंदाही मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाच्या चमूने सुरक्षित बाहेर देखील काढले आहे. परंतु अहेरी येथील अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आज अहेरी तालुक्यातील मोदूमतुर्रा गावाजवळ नदी काठावरील शेतात नावेतून पूर पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत काही अधिकारी देखील होते. याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे. यामध्ये विजय भाकरे आणि संबंधित अधिकारी सुरक्षा जॅकेटविना धोकादायक अशा लहान नावेतून पाहणी करताना दिसत आहेत. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाची कोणतीही चमू उपस्थित नव्हती. त्यामुळे ही पूर पाहणी वादात सापडली आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन सामान्य नागरिकांना सावधगिरीचा इशारा देत असताना प्रशासनातील एक जबाबदार अधिकारी अशाप्रकारे आपत्ती व्यवस्थापनाच्या सूचना पायदळी तुडवून स्वतःसह इतर अधिकाऱ्यांचाही जीव धोक्यात घालत असल्याने ही पूर पाहणी होती की पूर पर्यटन अशी चर्चा प्रशासनात आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

हेही वाचा – मुनगंटीवार यांची विरोधकांवर टीका, म्हणाले “एकदा कासव जिंकला म्हणून.. “

नदीकाठावरील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्या भागात आम्ही पूर पाहणी करण्याकरिता गेलो होतो. मात्र त्या ठिकाणी पाण्याची पातळी कमी होती. त्याचा अंदाज घेऊनच आम्ही नावेतून ही पाहणी केली. – विजय भाकरे, अप्पर जिल्हाधिकारी, अहेरी.

हेही वाचा – पोषण आहाराच्या चिक्‍कीमध्‍ये अळ्या… मेळघाटातील विद्यार्थ्यांनी पाकीट उघडताच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बहुतांश मार्ग खुले

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद होते. त्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. शुक्रवारी पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने बहुतांश मार्ग खुले झाले आहेत. यात गडचिरोली-नागपूर, गडचिरोली- चंद्रपूर आणि चामोर्शी या महत्वाच्या मार्गाचा समावेश आहे. मात्र, नदी काठावरील भागात पाणी साचल्याने अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरे पडली आहेत. जिल्हा प्रशासन पूर परिस्थितीचा आढावा घेत असून शक्य ती मदत करण्यात येत आहे.