गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पद घेतल्यावर सुद्धा गडचिरोलीतील आदिवासींची परवड सुरुच असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम पेंदूळवाही या छोट्या गावात पऱ्हे लागवडीसाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी करताना तरुण जखमी झाला. त्यास दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांनी खाटेची कावड केली. घनदाट जंगल, खडतर रस्त्यावरून तीन किलोमीटर पायपीट करत त्यास दवाखान्यात नेले. २ ऑगस्टला हा प्रकार घडला. यामुळे आदिवासीबहुल व अतिदुर्गम भागातील आरोग्यव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
मनीराम रामा हिचामी (३५,रा. पेंदूळवाही) असे रुग्णाचे नाव आहे. ते स्वत:च्या शेतात धान रोवणीसाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी करत होते. चिखलात टॅक्टर घसरून उलटले. यात मनीराम यांच्या कंबरेला दुखापत झाली. त्यांना इतरांनी ट्रॅक्टरमधून बाहेर काढले व जारावंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला; पण तेथील रुग्णवाहिका त्यावेळी एका रुग्णाला घेऊन गडचिरोलीला गेली होती. त्यामुळे हतबल कुटुंबीय व गावकऱ्यांनी खाटेची कावड केली व तीन किलोमीटर अंतर पार करून कसुरवाही गावापर्यंत आणण्यात आले. तेथे जारावंडीच्या डॉक्टरांनी परिचारिकेचे खासगी वाहने पाठविले होते. त्यातून मनीरामला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून उपचार केले. त्यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयात पाठविले.
वाहन जाण्यासाठी रस्ताच नाही
या गावाला मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी पक्का रस्ता नाही. रुग्णवाहिका असती तरी ती गावापर्यंत पोहोचली असती का हा प्रश्न आहे. रस्ता नसल्याने वाहन जात नव्हते, त्यामुळे जिथपर्यंत वाहन पोहोचू शकत होते, तिथपर्यंत खासगी वाहन धाडून रुग्णाला दवाखान्यात आणले. मात्र, यामुळे आदिवासीबहुल व दुर्गम भागातील पायाभूत सुविधांचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.
प्रतिक्रिया
जारावंडी येथे रुग्णवाहिका आहे; पण एका रुग्णाला घेऊन ती गडचिराेलीला आली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वत:चे वाहन पाठवून रुग्णाला आरोग्य केंद्रात आणून उपचार केले आहेत. – डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी