गडचिरोली : चामोर्शीवरून आष्टीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाला (एम.एच.३३ए ०८२५) महामार्गावर ‘यु टर्न’ घेताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू ट्रकने दिलेल्या जबर धडकेत कारमधील तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. विनोद काटवे (४५), राजेंद्र नैताम (४५), सुनील वैरागडे (५५) तिघेही राहणार गडचिरोली, अशी मृतांची नावे असून चामोर्शी येथील अनिल सातपुते हे गंभीर जखमी झाले आहे.
आज रविवार, १८ मे रोजी विनोद काटवे, राजेंद्र नैताम, सुनील वैरागडे हे लग्नसमारंभाकरिता चामोर्शी येथे आले होते. त्यानंतर आपल्या चारचाकी वाहनाने आष्टीकडे जाण्यासाठी निघाले. वाटेत त्यांनी चामोर्शी येथून अनिल सातपुते यांना सोबत घेतले. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास चामोर्शी ग्रामीण रुग्णालय समोरील वळणावर त्यांनी अचानक ‘यु टर्न’ घेतला. दरम्यान, त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या ट्रकने (सी.जी.०४ एल.डब्लू. ०८२५) जबर धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अनिल सातपुते गंभीर जखमी झाल्याने त्यांना गडचिरोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वाना रुग्णालयात दाखल केले. मात्र, यातील तिघांचा मृत्यू झाला होता.
ट्रक चालकाने अपघातानंतर वाहन तिथेच सोडून पळ काढला. अपघात एवढा भीषण होता की यात कारचा पूर्णत: चेंदामेंदा झाला. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. पोलीस निरीक्षक अमूल कादबाने पुढील तपास करीत आहे.
गडचिरोलीच्या हनुमान वॉर्डावर शोककळा
अपघातात ठार झालेले विनोद काटवे, राजेंद्र नैताम, सुनील वैरागडे हे तिघेही गडचिरोली शहरातील हनुमान वॉर्डातील रहिवासी होते. तिघेही नातेवाईकाच्या लग्नासाठी चामोर्शी येथे गेले होते. काही काम असल्याने ते आष्टी मार्गांवर जाण्यासाठी निघाले. मात्र, वाटेतच वळण घेतल्याने भीषण अपघात झाला आणि तिघांनाही आपला जीव गमवावा लागला. एकाचवेळी तिघांचा मृत्यू झाल्याने गडचिरोली हनुमान वॉर्डावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली दिसून येते. गेल्या आठवड्यात याच मार्गावर वेगवेगळ्या अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला होता.