बुलढाणा: विदर्भ पंढरी शेगाव नगरी येथे संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज गुरुवारी, २८ ऑगस्ट रोजी हजारो भाविकांची मांदियाळी जमली असून जिल्ह्यासह राज्यातील कमी अधिक ४५० दिंड्या दाखल झाल्या आहे. यामुळे शेगाव नगरी आबाल वृद्ध भाविकांनी गजबजली असून ‘गण गण गणात बोते’ च्या गजराने दुमदुमली आहे. विशेष सजावट करण्यात संत गजानन महाराज संस्थांनचे मंदिर, अजूनही होणारे दिंड्यांचे आगमन, समाधी स्थळी नतमस्तक होण्यासाठी लागलेल्या भाविकांच्या दीर्घ रांगा, भक्तांनी गजबजलेले लहान मोठे मार्ग,भगवे ध्वज व पताका यामुळे शेगाव नगरीचा आजचा थाट वेगळाच आहे.

त्याला निमित्त देखील खास आहे.आज ऋषींपंचमी असून याच पावन मुहूर्तावर महाराजांनी संजीवन समाधी घेतली होती. आज २८ ऑगस्ट रोजी श्रींचा पुण्यतिथी उत्सव सोहळा   भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे. त्याच आज श्रीं चा वार असलेला गुरुवार आल्याने भाविकांची जास्तच गर्दी उसळली आहे.

या सोहळ्यासाठी संतनगरी सज्ज झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास ४५० च्यावर भजनी दिंड्या काल बुधवार सायंकाळी उशिरा पर्यंत संत नगरीत दाखल झाल्या होत्या. दूरवरच्या भजनी दिंड्या येण्यांचा ओघ आजही सुरु आहे. श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्री संत गजानन महाराजांचा ११५ वा पुण्यतिथी उत्सव २४ ऑगस्ट  ते २९ ऑगस्ट या कालावधीत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज गुरुवारी सकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त समाधी सोहळ्यानिमित्त ह भ प भरत बुवा पाटील यांचे कीर्तन पार पडले. सकाळी १० वाजता श्री गणेशयाग व वरूणयागाची पुर्णाहूती व अवभृतस्नान पार पडले .

रात्री मंदिर खुले

राज्यातील हजारो भक्त श्रींच्या दर्शनासाठी शेगांव येथे दाखल होत आहे. भक्तांना लवकरात दर्शन घेता यावे, श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने बुधवार, गुरुवार असे दोन दिवस श्रीचे मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले .श्रींच्या मंदिर परिसरात व श्रींच्या समाधी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर संपूर्ण मंदिर परिसरात केळीचे खांब व आंब्याच्या पानाचे तोरण लावण्यात आले आहेत व सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

जय गजानन श्री गजानन, ज्ञानोबा तुकाराम, नाम विठोबाचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे, गण गण गणात बोते मंत्राचा नाम जप करत जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल असा श्रींच्या नामाचा गजर करत असंख्य भजनी दिंड्या संतनगरीत दाखल झाल्या आहे.श्रींच्या मंदिर परिसरात जाऊन श्रींचे समाधीचे व कळसाचे दर्शन करून नित्य मार्गाने जात आहेत.

पालखी परिक्रमा

श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींची पालखी दुपारी नगरपरिक्रमेसाठी निघेल.श्रींच्या पालखीचा परिक्रमा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. श्री पुण्यतिथी उत्सवानिमित्य २८ ऑगस्ट रोजी श्रींच्या पालखीचे  परिक्रमा  भजनी दिंडीसह दुपारी ४ वाजता मंदिर परिसरातून निघेल. श्री पालखी परिक्रमा मंदिर परिसरातील उत्तर द्वारातून, महात्मा फुले बँके समोरुन, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले चौकातून, श्री संत सावता माळी चौक, श्री हरिहर मंदिर जवळून, भिम नगर (तिन पुतळा परिसर), शाळा नं. २ (सावित्रीबाई फुले चौक), फुले नगरातून, श्री प्रगटस्थळ जवळून, सितामाता मंदिर, लायब्ररी जवळून (श्री गर्गाचार्य मंदिरा समोरुन), पश्चिम गेटमधून श्री मंदिर परिसरामध्ये सायं. ६.३० वाजताचे आसपास श्रींच्या पालखीचे आगमन होईल.

मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सर्वत्र मंदिर परिसरात केळीचे खांब व आंब्याच्या पानाची तोरण लावण्यात आली आहे. श्रींच्या नाम गजरात  फक्त तल्लीन होत श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात सहभागी होत आहे.

हजारों भाविकांनी घेतला महाप्रसाद

श्री गजानन सेवा समिती व्दारा श्रींच्या ऋषिपंचमी उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन अग्रसेन भवन येथे  काल २७ व आज २८ ऑगस्ट रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.शेगाव, नागपूर, अकोट, भक्त परिवार श्री गजानन सेवा समितीव्दारे दरवर्षी ऋषिपंचमी, रामनवमी, प्रगटदिन या उत्सव काळात श्रींच्या भक्तांना महाप्रसादाचे वितरण करून आपली सेवा श्रींच्या चरणी अर्पीत करतात.