बुलढाणा : संतनगरी शेगाव येथे आज गजानन महाराज यांचा १४६ वा प्रकट दिन पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात येत असतानाच दूरवरच्या अमेरिकेतही ‘गण गण गणात बोते’चा गजर झाला. अमेरिकेतील डग्लस येथील गजानन महाराज डिव्होटी मंडळाकडून प्रगट दिन डग्लस येथे हा उत्साहात साजरा करण्यात आला.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव येथील प्राजक्ता देशमुख, शेगाव येथील विश्वेश जानवरकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. तिथे स्थायिक झालेले महाराष्ट्र व देशातील अन्य भारतीय या उत्सवात सहभागी झाले. डग्लस येथील राम मंदिरात गजानन महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. तिथे हा सोहळा साजरा करण्यात आला.

हेही वाचा…‘गण गण गणात बोते’, शेगाव नगरीत लाखांवर भाविकांची मांदियाळी!

ढोल ताशे, भगव्या पताका घेऊन जाणारे बालक, बालिका, पारंपरिक भारतीय वेशभूषेतील भारतीय महिला व पुरुष भाविक, गजानन महाराजांच्या सुबक मूर्तीला करण्यात आलेली फुलांची आरास, ‘गण गण गणात बोते’ चा आसमंतात होणारा गजर, असा डग्लस मधील गजानन महाराज प्रगट दिन उत्सवाचा माहौल होता.