गजेंद्र चौहान यांचे स्पष्टीकरण

फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हीजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)च्या अध्यक्षपदी झालेली नियुक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली नसल्याचे अभिनेते गजेंद्र चौहान यांनी स्पष्ट केले. संघाशी लहानपणापासून जुळलो असून सरसंघचालक माझ्यासाठी पितृतूल्य असल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी आलो असल्याचे चौहाण म्हणाले.

‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी झालेल्या त्यांच्या नियुक्तीवरून विद्याध्र्यानी तीन महिने आंदोलन केले. पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच त्यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊन त्यांच्याशी यावेळी एक तास चर्चा केली.

त्यांच्या नियुक्तीवर विविध क्षेत्रातून टीका झाल्यानंतरही सरकारने ठाम भूमिका घेतल्यामुळे त्यांना बदलविण्यात आले नाही. दरम्यान, हा वाद आता शमला आहे. चौहाण यांनी सरसंघचालकांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांची नियुक्ती करण्यात आली असा आरोप  करण्यात आला असता प्रसार माध्यमांशी बोलताना चौहान म्हणाले, माझ्या  नियुक्तीत संघाचा कुठलाच हस्तक्षेप नाही. माझी नियुक्ती संघाच्या नेत्यांनी केली नाही. अनेक वर्षांपासून चित्रपट आणि दूरदर्शनवरील विविध मालिकांमध्ये काम करीत असल्यामुळे आणि या क्षेत्राचा अनुभव लक्षात घेऊन सरकारने निवड केली आहे.

‘एफटीआयआय’मध्ये तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. या काळात विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची परवनागी आहे. त्यानंतर एक वर्ष मुदतवाढ दिली जाईल, मात्र त्यावेळी वसतिगृहात राहता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तीन वषार्ंचे शुल्क घेतले जात असल्यामुळे त्यांना चौथ्या वर्षी वसतिगृहात राहण्याची परवानगी देता येत नाही.

मुलाच्या विवाहाची निमंत्रण पत्रिका देण्याचा शुभारंभ हा डॉ. भागवत यांच्यापासून करावा म्हणून त्यांची वेळ मागितली होती. आज भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले. छत्तीसगडमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जात असल्याचे चौहान यांनी सांगितले.