चंद्रपूर : ‘मनोरंजन क्लब’च्या नावाखाली महाराष्ट्र-तेलंगणा सिमाभागातील पोडसा, बामणी, गडचांदूर, बल्लारपूर, तथा कोरपना येथे गोव्याच्या धर्तीवर मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरू आहेत. तेलंगणा व महाराष्ट्रातील १५० ते २०० मोठे व्यापारी दररोज येथे जुगार खेळतात. तेलंगणातील एक व्यापारी ४० लाख रुपये एकाच दिवशी जुगारात हरल्यानंतर पोलिसांनी राजीव समाधान मल्टीपरपज सोसायटी या मनोरंजन क्लबवर छापा टाकला.
महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील गोंडपिंपरी तालुक्यातील पोडसा हे गाव लाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. या गावातील जुगार अड्ड्यावर लाखोंचा जुगार खेळला जातो. येथे तेलंगणातील १०० ते १५० मोठे व्यापारी दररोज जुगार खेळण्यासाठी येतात. ७० ते ८० चारचाकी वाहने महाराष्ट्रात सायंकाळच्या वेळी प्रवेश करतात. रात्री आठ वाजतापासून दोन वाजेपर्यंत हा जुगार अड्डा सुरू असतो. जुगार खेळणाऱ्यांसाठी मद्य व जेवणाची व्यवस्था तेथेच केली जाते. काही दिवसांपूर्वी आदिलाबाद जिल्ह्यातील छोटू इंगलवार येथे ४० लाख रुपये जुगारात हरला. यानंतर तो आजारी पडला.
‘राजीव समाधान मल्टीपरपज सोसायटी, रजि. नं. एफ ००१४८११ हिरापूर ब्रांच, पोडसा रमी सक्सेसफुली रनिंग,’ अशा आशयाने जुगारप्रेमींना निमंत्रण दिले जाते. रात्रभर जुगार सुरू राहत असल्याने येथे नुसता गोंधळ असतो.
क्लबचा संचालक आणि संयोजकावर गुन्हे
‘मनोरंजन क्लब’ म्हणून परवानगी असताना येथे मात्र गोव्याच्या धर्तीवर जुगार चालतो, अशी गुप्त माहिती चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी पोडसा येथील राजीव समाधान मल्टीपरपज सोसायटी, हिरापूर, ता. कोरपना या मनोरंजन क्लबवर छापा टाकला. क्लबचा संचालक महेश्वर गोपालनायक अजमेरा (४२, रा. चिंताकुंडा, ता. शिरपूर, जि. आसिफाबाद, तेलंगणा) याने संयोजकांशी संगनमत करून मनोरंजनाच्या नावाखाली अनाधिकृत जुगार भरवला आणि परवाना अटी व सुचनांचे जाणिवपूर्वक उल्लंघन केले, असे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी क्लबचा संचालक अजमेरा आणि संयोजक तसेच जुगार खेळणारे आणि अपप्रेरणा देणाऱ्यांविरोधात लाठी उपपोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले.
मंत्रालयातून परवानगी
राजीव समाधान मल्टीपरपज सोसायटी या ‘मनोरंजन क्लब’चा परवाना स्थानिक पातळीवर रद्द करण्यात आला होता. मात्र, या क्लबच्या संचालकाने मंत्रालयातून परवाना मंजुरी मिळवली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.