यवतमाळ : गौरी अर्थात महालक्ष्मी पूजन सोमवारी विदर्भात सर्वत्र भक्तिभावाने साजरे झाले. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा गौरी पूजनानिमित्त जपल्या जातात. मात्र येथील प्रा. डॉ. विवेक जगताप यांनी परंपरा आणि तंत्रज्ञानाचा अनोखा मेळ घालत गौरी पूजन केले.

गणेश चतुर्थीच्या चौथ्या दिवशी गौरी पूजन हा सण कुळाचार म्हणून समाजात श्रद्धापूर्वक पाळला जातो. गौरी पूजन म्हणजे सासरी गेलेली मुलगी अडीच दिवसांसाठी माहेराला येण्याचा सोहळा आहे. ज्येष्ठा गौरी आवाहन, ज्येष्ठा गौरी पूजन आणि आणि ज्येष्ठा गौरी विसर्जन, हा सण माहेरवाशीणींचा असल्यामुळे तिच्या आवडीचे पदार्थ करण्यात येतात.

गौरी आवाहनाच्या दिवशी गौरीला घरातील भाजी आणि भाकरीचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो. ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी तिच्यासाठी पंचपक्वानांचा नैवेद्य केला जातो. गौरी पूजन सर्व पावित्र्य जपून केले जाते. महालक्ष्मीच्या पूजनाला प्रसादाचे अनन्य साधारण महत्व आहे. हे जाणून येथील प्रा. डॉ. विवेक जगताप, त्यांचा मुलगा अर्थ आणि भाचा रुद्राक्ष राऊत यांनी परंपरा आणि तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे एक नावीन्यपूर्ण डिव्हाईस विकसित केले. घरातील महालक्ष्मीसमोर ठेवलेल्या या विशेष यंत्रामधून भक्तांच्या पुढ्यात प्रसाद येतो. भक्ताने देवीला नमस्कार करताच आपोआप घंटानाद होतो आणि त्याचवेळी यंत्रामधून प्रसाद बाहेर पडतो. भक्तांसाठी हा अनुभव अत्यंत वेगळा व उत्साहवर्धक ठरत आहे.

महालक्ष्मीच्या उत्सवानिमित्त सजविण्यात आलेले हे यंत्र पाहण्यासाठी नागरिक प्रा. जगताप यांच्या घरी मोठ्या संख्येने भेट देत असून, या प्रयोगाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे. अध्यात्म आणि आधुनिकतेचा संगम साधणाऱ्या या कल्पक यंत्रामुळे प्रा. डॉ. विवेक जगताप, अर्थ जगताप व रुद्राक्ष राऊत यांचे कौतुक होत आहे.

आज गौरी विसर्जन

परंपरेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होते. ज्येष्ठ नक्षत्रावर गौरी पूजन आणि  मूळ नक्षत्रावर विसर्जन करण्याची परंपरा आहे. तीन दिवस गौरीचे व्रत केले जाते. यावर्षी ३१ ऑगस्टला गौरीचे आगमन झाले. १ सप्टेंबरला गौरी पूजन झाले, तर आज मंगळवारी गौरी विसर्जन होणार आहे. गौरी विसर्जन आणि गणपती विसर्जन एकाच दिवशी आल्यास आधी गौरी विसर्जन करतात. घरातील महिला सायंकाळी गौरीची पूजा करुन आरती करतात आणि तुला मनातील गाऱ्हाणे सांगून वाजत-गाजत निरोप देतात.