नागपूर : दाभा परिसरात प्रियकराने लोखंडी रॉडने प्रेयसीवर हल्ला करून खून केल्याप्रकरणात गिट्टीखदान पोलिसांनी ६ दिवसांच्या आत तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले. खुनाच्या प्रकरणात इतक्या कमी वेळात तपास पूर्ण करून आरोप पत्र दाखल करण्याची ही पहिलीच घटना आहे.

आरोपी अक्षय प्रभाकर दाते (२५) रा. हिंगणघाट, याने गत ६ मे रोजी दाभाच्या एसएसडी पीस रेसिडन्सी अपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या हेमलतावर लोखंडी पाईपने हल्ला केला. डोक्यावर सपासप वार करून तिचा खून केला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत गिट्टीखदान पोलिसांनी वेगवेगळी पथके गठित करून दुसऱ्याच दिवशी आरोपी अक्षयला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांपुढे आरोपीविरुद्ध पुरेसे पुरावे गोळा करण्याचे मोठे आवाहन होते.

पोलीस उपायुक्त राहुल मदने व गिट्टीखदानचे ठाणेदार कैलाश देशमाने यांनी शारदा भोपाळे, चेतन बोरखेडे, शरयू देशमुख, विनोद खाडे आणि प्रविण संगीतराव यांच्या नेतृत्वात पथकांचे गठन केले. या सर्व पथकांवर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यासोबतच प्रत्यक्षदर्शी आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवली. हेमलता आणि अक्षय हे दोघेही एकाच गावचे होते. दोघांमध्ये प्रेम संबंध होते. अक्षयला हेमलताशी लग्न करायचे होते. मात्र या दरम्यान हेमलताचे अन्य एका युवकाशी सूत जुळले होते. त्यावरून दोघात वाद सुरू होता. या वादातूनच अक्षयने हेमलतावर हल्ला करून खून केला.

दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवून घेतली साक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक पुरावे जमा करण्यासोबतच न्यायालयात दंडाधिकाऱ्यांसमोर साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यासाठी परवानगी मागितली. न्यायालयातून परवानगी मिळताच पोलिसांनी सर्व साक्षीदारांची साक्षही नोंदवून घेतली. सर्व पुराव्यांसोबत पोलिसांनी ६ दिवसांच्या आत आरोप पत्रही दाखल केले.