नागपूर: सोन्याचे दर एक लाखावर पोहचल्यावर प्रथमच घसरून मंगळवारी (२४ जून २०२५) निच्चांकीवर आले आहे. मागील २४ तासात सोन्याचे दर चांगलेच घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपुरातील सोन्याच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या. लग्न सराईच्या दिवसात सोन्याचे वाढते दर ग्राहकांची चिंता वाढवत होते. त्यामुळे ग्राहकांकडून दागिने खरेदी दरम्यान आवश्यकतेनुसार खूप कमी वजनाच्या दागिन्यांनाच प्राधान्य दिले जात होते. बघता- बघता सोन्याचे दर विक्रमी उंचीवर गेल्यावर ग्राहकांकडून हे दर कमी कधी होणार? हा प्रश्न सराफा व्यवसायिकांना विचारला जात होता. तर सराफा व्यवसायिक दर आणखी वाढण्याचे संकेत देत होते. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात १३ जूनला जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून सोन्याच्या दराने २४ कॅरेटमध्ये प्रति दहा ग्राम १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता.
दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर २३ जून २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९९ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९२ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७७ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार ७०० रुपये नोंदवले गेले. हे दर २४ जूनला दुपारी १२ वाजता प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९८ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९१ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६३ हजार ९०० रुपये होते. तर दुपारी साडेचार वाजता हे दर आणखी खाली येऊन २४ कॅरेटसाठी ९७ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९० हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६३ हजार ४०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात सोन्याच्या दरात २३ जूनच्या तुलनेत २४ जूनला दुपारी ४ वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटमध्ये प्रति १० ग्राम २ हजार रुपये, २२ कॅरेटमध्ये १ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटमध्ये १ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटमध्ये १ हजार ३०० रुपयांनी घसरल्याचे दिसत आहे.
चांदीच्या दरातही घसरण…
नागपुरातील सराफा बाजारात मेकिंग व जीएसटी शुल्क वगळता चांदीचे दर प्रति किलो २३ जून रोजी १ लाख ७ हजार ९०० रुपये होते. हे दर २४ जुनला दुपारी साडेचार वाजता प्रति किलो १ लाख ७ हजार रुपये नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात २४ तासात ९०० रुपये प्रति किलोने घट झालेली दिसत आहे.