नागपूर: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादल्यावर सोन्याचे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटमध्ये जीएसटी व मेकिंग शुल्क वगळून एक लाखाहून वर गेले होते. सणासुदीच्या दिवसात हे दर आणखी वाढण्याचे संकेत सराफा व्यवसायिकांकडून दिले जात होते. परंतु उलट सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे हे दर पून्हा प्रति दहा ग्राम १ लाखाहून खाली आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारे एकूण आयातशुल्क ५० टक्क्यांवर नेल्याने भारतातील सराफा व्यवसाय अडचणीत येण्याचा धोका ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने (जीजेसी) वर्तवला होता. या घटनेनंतर सोन्याचे दर वाढले होते. नागपुरातील सराफा बाजारात १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम १ लाख २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९३ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ७८ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. त्यानंतर हे दर आणखी वाढण्याचे संकेत सराफा व्यवसायिकांकडून वर्तवले जात होते.

दरम्यान नागपुरात जन्माष्टमीच्या काळात शनिवारी (१६ ऑगस्ट २०२५ रोजी) सोन्याचे दर घसरून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ९९ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९२ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ७७ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. हे दर सध्या घसरले असले तरी येत्या काळात आणखी वाढण्याचे संकेत सराफा व्यवसायिक देत आहे. हा काळ सोने- चांदीचे दागिने खरेदीसाठी चांगला असल्याचा सराफा व्यवसायिकांचा दावा आहे. दरम्यान नागपुरात १४ ऑगस्टच्या तुलनेत १६ ऑगस्टला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी २०० रुपये घसरले आहे.

चांदीच्या दरातही बदल…

नागपुरातील सराफा बाजारात १४ ऑगस्टला सकाळी चांदीचे दर प्रति किलो १ लाख १६ हजार १०० रुपये होते. हे दर १६ ऑगस्टला प्रति किलो १ लाख १५ हजार १०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे १४ ऑगस्टच्या तुलनेत १६ ऑगस्टला चांदीच्या दरात प्रति किलो १ हजार रुपये घट झाल्याचे दिसत आहे.