गोंदिया : अर्जुनी तालुक्यातील दल्लीनंतर, गेल्या तीन ते चार दिवसांपासून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मुंगली गावात बिबट्याने कहर केला आहे. मुंगली येथील रहिवासी पदम यशवंत राऊत यांच्या घरात एका बिबट्याने घुसून कोंबड्यांची शिकार केली. शिवाय, बिबट्याने इतर गावकऱ्यांच्या कोंबड्या ही खाल्ल्या आहेत.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या काही दिवसांपासून मुंगली आणि आसपासच्या गावांमध्ये नागरिकांना बिबट्या दिसू लागले आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंगली येथील रहिवासी पदम यशवंत राऊत यांनी त्यांच्या घरासमोर कोंबड्या ठेवण्यासाठी पिंजरा बनवला होता. तो टिनाच्या पत्राने झाकलेला ही होता.
बिबट्याने हा टिनाचा पत्रा काढून कोंबड्या खाल्ल्या. गेल्या काही दिवसांपासून सुरगावच्या सावरटोला, बोरटोला येथे बिबट्याने शेळ्या आणि कोंबड्यांची शिकार केली आहे. त्याचप्रमाणे आदर्शनगर मुंगली येथील रहिवासी देवानंद बळीराम कोल्हे यांच्या घरातील कोंबड्याही बिबट्याने खाल्ल्या आहेत. तालुक्यातील सुरगाव, चापटी, सावरटोला, बोरटोला, देवलगाव, येरंडी या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरु असून, शेतकरी व पशुपालकांत भीतीचे वातावरण आहे.
या तिन्ही वस्त्यांवर एक दिवसाआड बिबट हजेरी लावत आहे व कोंबडे-कोंबड्यावर ताव मारत आहे. या तिन्ही वस्त्यांवर बिबट्याचा अचानक वावर वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी अनेकदा बिबट्याने कोंबडे कोंबड्या फस्त केले आहेत. या परिसरात बिबट्याचा वावर आहे. असे असताना वन विभागाला वारंवार कळवून सुद्धा वन विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मुंगलीवासीयांनी केला आहे. काल-परवाच्या घडलेल्या घटने वरून वनविभागाने बिबट्याचा चोख बंदोबस्त करावा. अशी मागणी मुंगली ग्रामवासियांनी केली आहे.
