गडचिरोली : उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठांसाठी राबवलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘सेवाकर्मी’ उपक्रमात गोंडवाना विद्यापीठाने बाजी मारली आहे. प्रशासकीय कार्यपद्धती, गतिमानता आणि कर्मचारी सेवांशी निगडित विविध कठोर निकषांवर झालेल्या राज्यस्तरीय गुणांकनात, गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले आहे.

विद्यापीठाचा मंजूर आकृतीबंध व त्याची अंमलबजावणी, सेवाप्रवेश नियमांची काटेकोर अंमलबजावणी, सर्व संवर्गांच्या अद्ययावत केलेल्या जेष्ठता सुची, सरळसेवा भरती आणि पदोन्नती प्रक्रियेची सद्यस्थिती, बिंदूनामावलीचा अचूक वापर, तसेच अनुकंपा तत्वावरील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यातील वेग यावर या गुणांकनाचा भर होता. यासोबतच, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत ‘आयजीओटी’ पोर्टलवरील प्रशिक्षण नोंदणी, कर्मचाऱ्यांनी पूर्ण केलेले अभ्यासक्रम, सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांचे केलेले डिजिटायझेशन आणि कार्यालयीन प्रक्रिया अधिक पारदर्शक व गतिमान करण्यासाठी उचललेली पाऊले, या सर्वच घटकांनी गोंडवाना विद्यापीठाला हा बहुमान मिळवून दिला.

या अभूतपूर्व कामगिरीबद्दल कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुखांचे आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. ‘हे यश एकत्रित परिश्रमाचे फळ आहे. प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना दर्जेदार आणि जलद सेवा देणे हेच आमचे प्राधान्य असून, उत्कृष्टतेचा हा स्तर यापुढेही कायम ठेवू,’ अशी प्रतिक्रिया डॉ. बोकारे यांनी व्यक्त केली. विद्यापीठातील सातत्यपूर्ण कामगिरी आणि प्रशासकीय शिस्त यामुळेच ‘सेवाकर्मी’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी शक्य झाली, असेही त्यांनी नमूद केले.

विद्यापीठाची ही कामगिरी आकस्मिक नसून, सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग आहे. यापूर्वीही गोंडवाना विद्यापीठाच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे रोवले गेले आहेत. राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाला मिळालेला राज्यशासनाचा पुरस्कार, दोन राष्ट्रीय रासेयो पुरस्कार, वेळेत निकाल जाहीर केल्याबद्दल थेट राज्यपालांकडून मिळालेले प्रशस्तीपत्र, तसेच ग्रामसभा सक्षमीकरण प्रकल्पासाठी भारत सरकारचा ‘फिक्की’ पुरस्कार आणि ‘ई-समर्थ’ प्रणालीच्या अंमलबजावणीत राज्यात पटकावलेला द्वितीय क्रमांक, अशा उल्लेखनीय कामगिरीच्या श्रृंखलेत आता ‘सेवाकर्मी’च्या या अव्वल स्थानाची भर पडली आहे.

विद्यापीठ राज्यात प्रथम आल्याने प्रशासनापासून ते कर्मचारीवर्गापर्यंत सर्वांमध्ये उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. या यशामुळे केवळ विद्यापीठाची प्रतिष्ठाच उंचावली नाही, तर आदिवासीबहुल व दुर्गम गडचिरोली आणि चंद्रपूरसारख्या जिल्ह्यांमधील उच्च शिक्षणाची गुणवत्ता आणि प्रशासकीय कार्यक्षमता याबद्दल एक अत्यंत सकारात्मक संदेश राज्यभरात पोहोचला, अशी भावना विद्यापीठ वर्तुळातून व्यक्त होत आहे.