वाशीम : पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. ‘प्रीमियम’ भरूनही शेतकऱ्यांना अत्यल्प मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. उर्फीच्या कपड्यांची सरकारला काळजी आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला सरकारकडे वेळ नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी रिसोड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पीक विमा हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तुपकर म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असे म्हणाले होते. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई दिली नाही तर सरकारच्या बुडाखाली आग लावून मुंबई येथील पीक विमा कंपनीचे कार्यालय उद्ध्वस्त करू, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. या मोर्चाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा >>> नागपूर : ‘एसटी’तीलही अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांनाही लाभ, महामंडळाकडून अखेर आदेश निघाले

सरकार आणि विमा कंपनीचे साटेलोटे

वेळेत प्रीमियम भरूनही शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात कंपनी टाळाटाळ करीत आहे. रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची तर कंपनीने थट्टा सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार वारंवार दुर्लक्ष करत आहे. सरकार आणि विमा कंपनीचे साटेलोटे असल्याचा आरोपही तुपकर यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government cares more about urfi clothes than farmers ravikant tupkar alleges pbk 85 ysh
First published on: 19-01-2023 at 17:33 IST