करोनाच्या संसर्गामुळे तेंदू व मोहफु लाच्या व्यवसायावर संकट आल्याने लाखो कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. यापार्श्वभूमीवर गावातील नागरिकांनी संसर्ग होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेऊ, पण आम्हाला व्यवसायाची परवानगी द्या, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यांची ही मागणी मान्य झाली असून त्याचा लाभ या नागरिकांना होणार आहे. लोकसत्ताने गुरुवारच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते.
राज्यातील पूर्व विदर्भ व खान्देशात अनेक जिल्ह्य़ात आदिवासी व इतर वननिवासी नागरिक मार्च ते जून या काळात मोहफुले व तेंदूपाने गोळा करून विक्री करतात. त्यांच्या उपजीविके चे हे मुख्य साधन आहे. सामूहिक वनहक्क प्राप्त गावांच्या अनेक ग्रामसभा तेंदूपाने थेट संग्रहण करून विकतात. करोनाच्या प्रादुर्भावामुळे हा व्यवसाय प्रभावित झाला होता. त्याचा ग्रामीण अर्थकारणावरही दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे या व्यवसायाला परवानगी देण्याची मागणी विदर्भ उपजीविक मंचाने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून केली होती.
मंत्री तसेच अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आल्यानंतर ही मागणी मंजूर झाली असून राज्यातील वने व वनेत्तर क्षेत्राततून तेंदू पाने व इतर वनउपज गोळा करून विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे वनहक्कप्राप्त गावे व त्यांच्या महासंघांना तेंदूपाने गोळा करून विक्री करणे शक्य होणार आहे. अशाच प्रकारची परवानगी केंद्र शासनाच्या गृह विभागाच्या सचिवांनी एका आदेशाद्वारे जाहीर केली आहे.