नागपूर : राज्याच्या वनखात्याला मानव-वन्यजीव संघर्षांला आळा घालणे कठीण होत असतानाच आता ओडिशातून भरकटलेला सुमारे २३ हत्तींचा कळप छत्तीसगडमार्गे गडचिरोली जिल्ह्य़ात दाखल झाल्याने वनखात्यासमोरचे आव्हान वाढले आहे. या हत्तींच्या हल्ल्यात जिल्ह्य़ातील धानोरा तालुक्यातील कन्हारटोला शेतशिवारात अशोक मडावी हा शेतकरी गंभीर जखमी झाला.गडचिरोली जिल्ह्य़ातील कमलापूर येथे वनखात्याचा हत्ती कॅ म्प आहे, पण ओडिशातून आलेल्या जंगली हत्तीच्या या कळपाने शेतात धुमाकू ळ घातल मोठय़ा प्रमाणात पिकांचे नुकसान केले आहे. आधीच परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे कं बरडे मोडले असताना आणि तृणभक्षी प्राण्यांपासून शेतातील पीक वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्यांसमोर हत्तींचे नवे संकट उभे झाले आहे. छत्तीसगड सीमेकडील जंगलात गेल्या चार दिवसांपासून हत्तींचे वास्तव्य आहे. वनखाते त्यांच्यावर नजर ठेवून असले तरीही एका शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याने नव्या संघर्षांचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यांना परतीचा मार्ग सापडला नाही तर संघर्ष वाढू शकतो. वनखात्याला हत्तींनाच आवर घालणे खात्याला कठीण झाले आहे. यात काही वर्षांपूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत माहूत आणि एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. हे हत्ती भरकटले नसून त्यांना अधिवासातून हाकलले असण्याची शक्यताही आहे. त्यामुळे वनखाते त्यावर काय निर्णय घेते यावर संघर्षांची तीव्रता अवलंबून आहे.

गोंदिया व गडचिरोली जिल्ह्य़ातील दरेकसा, राजोली, टिपागड, भामरागड हा हत्तीचा अधिवास म्हणून उपयुक्त ठरू शकतो, असेही या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवींचे म्हणणे आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्हय़ाच्या सीमेत कधी दोन तर कधी तीन हत्ती येत आहेत, पण  शेकडो वर्षांनंतर विदर्भात रानटी हत्ती एवढय़ा मोठय़ा संख्येत आले आहे.

पहिल्यांदाच लहान-मोठय़ा हत्तींचा एवढा मोठा कळप पाहून भ्रमणध्वनीने छायाचित्र काढणाऱ्या लोकांना आवरणे कठीण झाले आहे. यासाठी वनखात्याने आवाहन करीत आहे. दरम्यान, हत्तीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला नागपूरला हलवण्यात आले आहे.