एक लाख लोकांच्या स्वाक्षरीचे निवेदन सादर

हलबा समाजाला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी समाजाच्यावतीने रविवारी भाजप नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल भागातील निवासस्थानावर मोर्चा नेण्यात आला.

एक लाख लोकांची स्वाक्षरी असलेले एक निवेदन गडकरींना देण्यात आले. हलबा क्रांती मोर्चा असे या मोर्चाला नाव देण्यात आले होते. दुपारी १२ वाजता गोळीबार चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. गडकरी यांच्या निवासस्थानाकडे तो जात असताना दुपारी १ वाजता चिटणवीस पार्कजवळ पोलिसांनी त्याला अडविले. तेथे सुमारे एक तास मोर्चेकऱ्यांनी घोषणा देत निदर्शने केली. त्यानंतर सहा सदस्यीय शिष्टमंडळ गडकरीना भेटण्यासाठी गेले. पुढील सहा महिन्यात हलबांच्या मागणीवर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले. शिष्टमंडळात प्रा. अभय धकाते, दिलीप नंदनवार, रमेश संत, देवराव उमरेडक, संतोष कोहाड यांचासमावेश होता.हलबा समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत आहेत.

एस.टी.साठी राखीव जागांचे लाभ घेताना त्यांना अडचणी येत आहेत. या समाजातील सरकारी नोकरीत असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करताना अडथळे निर्माण केले जात आहेत. हे प्रमाणपत्र न मिळाल्याने भाजपचे उमरेडकर यांना महापौरपद सोडावे लागले होते. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला, या मुद्दय़ावर विविध भाजपसह इतरही पक्षांनी वेळोवेळी आश्वसन दिले होते. या प्रश्नावर भाजपने सहाय्यकाची भूमिका बजावली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी गडकरी यांनी हलबा समाजाला त्यांची मागणी पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते. त्यांनी केंद्रीय पातळीवरही हा मुद्दा लावून धरला. केंद्रीय आदिवासी विकास मंत्र्यांसोबत त्याची दोन वेळा बैठकही झाली. मात्र, अजूनही हलबांना न्याय मिळाला नाही, असे हलबा सेवा समितीचे अध्यक्ष प्रा. अभय धकाते म्हणाले.