प्रमोद खडसे, लोकसत्ता

वाशीम: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचा विस्तार आता महाराष्ट्रात सुरु केला आहे. मागील महिन्यात केसीआर यांची नांदेडमध्ये भव्य सभा झाली. त्यावेळी अनेकांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. आता विदर्भातील ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बीआरएसचा झेंडा हाती घेतला असून ते विदर्भातील यवतमाळ- वाशीम, चंद्रपूर किंवा हिंगोली लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भटके विमुक्त, ओबीसी नेते म्हणून माजी खासदार हरिभाऊ राठोड परिचीत आहेत. यापूर्वी त्यांनी भाजप, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्षात काम केले आहे. त्यांनी ४ मार्च रोजी के. चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला. २३ मार्च रोजी मानोरा तालुक्यातील फुल उमरी येथे कार्यक्रम घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते २९ मार्च रोजी पोहरादेवी येथे भारत राष्ट्र समितीचा मेळावा घेणार असून या मेळाव्याला बीआरएसच्या मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे देखील येण्याची शक्यता आहे. दोन वेळा खासदार राहिलेले हरिभाऊ राठोड यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केल्याने विदर्भातील राजकीय आखाड्यात बीआरएसची जादू चालणार का ? यामुळे राजकीय समीकरणे बदलणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र भारत राष्ट्र समिती च्या गळाला राज्यातील अनेक नेते लागत असल्याने इतर पक्षांची चिंता वाढली आहे.