आरोग्य विभागाचा गट ‘ड’चा पेपर फुटल्याचे सिद्ध!

३१ ऑक्टोबरला झालेल्या गट ‘ड’ पदाची तिच्या मित्राची प्रश्नपत्रिका तपासली असता हा संपूर्ण प्रकार समोर आला.

अमरावतीच्या विद्यार्थिनीची स्वतंत्र परीक्षा

देवेश गोंडाणे, लोकसत्ता 

नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अमरावती येथील परीक्षा केंद्रावर २४ ऑक्टोबरला गट ‘क’ कनिष्ठ लिपिक पदाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनीला रविवार, ३१ ऑक्टोबरच्या गट ‘ड’ पदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. यासंदर्भात ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध वृत्ताची आरोग्य विभागाने दखल घेत गट ‘ड’ची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचे  मान्य करीत संबंधित विद्यार्थिनीची स्वतंत्र परीक्षा घेण्याचे मान्य केले आहे. त्यावरून ३१ ऑक्टोबरच्या गट ‘ड’च्या परीक्षेचा पेपर २४ ऑक्टोबरलाच फुटल्याचे सिद्ध झाले आहे.

३१ ऑक्टोबरला झालेल्या गट ‘ड’च्या दुपारच्या सत्रातील परीक्षेचा पेपर फुटल्याची पुण्यामध्ये पोलीस तक्रार करण्यात आली असून सायबर विभाग याचा शोध घेत आहे. प्राथमिक तपासात औरंगाबाद येथून पेपर फुटल्याची माहितीही मिळाली आहे. अमरावती येथील परीक्षा केंद्रावर २४ ऑक्टोबरला गट ‘क’ कनिष्ठ लिपिक पदाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनीला रविवार, ३१ ऑक्टोबरच्या गट ‘ड’ पदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. संबंधित विद्यार्थिनीने गट ‘क’मधील कनिष्ठ लिपिक पदाची उत्तरतालिका तपासली असता प्रश्नपत्रिका आणि उत्तरे जुळत नसल्याने तिने शंकेपोटी ३१ ऑक्टोबरला झालेल्या गट ‘ड’ पदाची तिच्या मित्राची प्रश्नपत्रिका तपासली असता हा संपूर्ण प्रकार समोर आला. यामुळे आरोग्य विभागाच्या गट ‘ड’चा पेपर हा २४ ऑक्टोबरलाच बाहेर आल्याने आता संपूर्ण परीक्षेचे नियोजन आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला.

विद्यार्थिनीवर दबाव?

‘लोकसत्ता’ने अमरावती येथील परीक्षा केंद्रावर झालेला गोंधळाचे वृत्त प्रकाशित करताच आरोग्य विभाग आणि परीक्षा घेणाऱ्या ‘न्यास’ कंपनीने आता संबंधित विद्यार्थिनीवर दबाव टाकणे सुरू केले आहे. विद्यार्थिनीला त्यांच्याकडून सतत संपर्क करून पेपर फुटल्याची माहिती कुणाला देऊ नका, तुझी वेगळी परीक्षा घेऊ अशा प्रकारे दबाव टाकला जात आहे.

आरोग्य विभागाने त्या विद्यार्थिनीला चौकशीनंतर स्वतंत्र परीक्षा घेऊ असे पत्र पाठवले आहे. यावरून गट चा पेपर २४ ऑक्टोबरला फुटल्याचे सिद्ध होते. आरोग्य विभागाने कितीही सारवासारव केली तरी पेपर फुटला हे न्यायालयात सिद्ध करायला जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे दोन्ही परीक्षा रद्द कराव्या.

– नीलेश गायकवाड, सचिव, एमपीएससी समन्वय समिती

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Health department exam paper leak confirm zws

Next Story
संपाचा सर्वसामान्यांना फटका!
ताज्या बातम्या