* महापारेषणचे १३२ केव्हीच्या ३ वहिनीत बिघाड  * नागपुरातील बऱ्याच वाहिन्यांवर वृक्ष पडली

नागपूर: नागपुरात मंगळवारी पडलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने महापरेषणचे १३२ केव्हीच्या ३ वाहिन्यात तांत्रिक बिघाड, तर महावितरणच्या बऱ्याच वीज यंत्रणेवर वृक्ष पडणे वा इतर तांत्रिक बिघाडाने शहरातील सुमारे ४० टक्के भागात वीज पुरवठा खंडित झाला. उकाड्याने नागरिक त्रस्त असतांना वीज खंडित झाल्याने शहरातील विविध भागात नागरिकांनी संताप व्यक्त केला.

नागपूर शहरात मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आला. त्यामुळे महापारेषणच्या अंबाझरी-हिंगणा -१ या १३२ केव्ही  वाहिनी मध्ये बिघाड झाला. त्याने मानकापूर उपकेंद्रला होणारा वीज पुरवठा बंद झाला. या दरम्यान महापारेषणच्या  अंबाझरी- मानकापूर या वाहिनीतही ओव्हरलोडमुळे बिघाड झाला. त्यामुळे महापारेषणच्या १३२ केव्ही मानकापूर, १३२ केव्ही हिंगणा-१ व १३२ केव्ही उप्पलवाडी या उपकेंद्रातून महावितरणच्या ग्राहकांना होणारा वीज पुरवठा साधारणतः अर्धा तास  बाधित झाला होता. महापारेषणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी तातडीने वीज पुरवठा सुरु केला. दरम्यान   वादळी वाऱ्यांमुळे नागपूर शहरातील वीज यंत्रणेवर परिणाम झाला असून  वीज पुरवठा सुरळीत  राहावा  यासाठी महावितरणचे अभियंते व जनमित्र सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचे महावितरणच्या जनसंपर्क विभागाचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातही स्थिती कायम होती.