अमरावती जिल्‍ह्यात मुसळधार; वरूड तालुक्‍यात पूरस्थिती; बारा तासांत ९२ मिमी पाऊस

जिल्‍ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्‍या मुसळधार पावसामुळे पुन्‍हा एकदा जनजीवन विस्‍कळीत झाले असून वरूड तालुक्‍याला पुराचा मोठा फटका बसला आहे.

अमरावती जिल्‍ह्यात मुसळधार; वरूड तालुक्‍यात पूरस्थिती; बारा तासांत ९२ मिमी पाऊस
मुसळधार पावसामुळे पुन्‍हा एकदा जनजीवन विस्‍कळीत झाले आहे.

अमरावती : जिल्‍ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्‍या मुसळधार पावसामुळे पुन्‍हा एकदा जनजीवन विस्‍कळीत झाले असून वरूड तालुक्‍याला पुराचा मोठा फटका बसला आहे. वरूड शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. गेल्‍या बारा तासांमध्‍ये ९२ मिमी पावसाची नोंद झाली असून शेंदूरजनाघाट, पुसला, वरूड, बेनोडा, वाठोडा या महसूल मंडळांमध्‍ये ७५ ते ११० मिमी पाऊस झाला आहे.

PHOTOS : विदर्भात पावसाचा पुन्हा कहर

जरूड, सातनूर, गव्‍हाणकूंड, बहादा, शेंदूरजनाघाट येथे पूरस्थिती आहे. संततधार आणि पूरस्थिती यामुळे हजारो गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागली. वरूड तालुक्यात रविवारी दिवसभरात दोनदा झालेल्या पावसामुळे वरूड-अमरावती महामार्ग काही काळासाठी बंद झाला होता.  वरूड, जरूड, मांगरूळ, शेंदूरजनाघाट येथील सखल भागांमध्ये काही फूट पाणी शिरल्याने नागरिकांना दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला.

शेकदरी प्रकल्प ओसंडून वाहू लागल्‍याने शेंदूरजना घाट, जरूड, मांगरुळी पेठ या गावातील जीवना, देवना, चुडामणी, सोकी या नद्यांना पूर आला. नदीशेजारील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. गव्हाणकुंड येथील कपिलेश्वर शिवमंदिर पाण्यात बुडाले होते. बहादा गावालाही पाण्याने वेढले. वरूड-अमरावती महामार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वरूड ते जरूड संपर्क तुटला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली.

जरूड येथील रविवार बाजार व नदीकाठच्या घरांमध्‍ये पाणी शिरले. वरूड शहरातील शनिवारपेठ, मिरची प्लॉटही पाण्याखाली गेला. पाणीपातळी अजूनही कमी झालेली नसल्याने नागरिक भयभीत आहेत. मिळेल ती साधने घेऊन मोठ्या संख्येने नागरिकांनी सुरक्षित स्थळ गाठले. पूरस्थिती पाहता अमरावतीहून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ) पाचारण करण्‍यात आले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heavy rains amravati district flood situation 92 mm rain twelve hours ysh

Next Story
नागपूर : … अन् १८ विद्यार्थ्यांनी भरलेली ‘स्कूल व्हॅन’ थेट नाल्यात उलटली
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी